एकनाथ शिंदेंचा किनारा स्वच्छता मोहिमेत सहभाग

22 May 2023 16:49:00
cm Eknath Shinde in coastal cleaning campaign

मुंबई
: जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रुप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केले असून त्यासाठी पाऊले उचलली आहेत. यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातला एक मिनिट वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि ऱ्हास कमी होईल. ग्लोबल वॅार्मिंग आणि वातारणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल असे मत ही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.

दरम्यान, जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतले. यावेळी नागरिकांनीही होकार देत मुंबई महानगरपालिकेच्या कामाला पोचपावती दिल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0