आपली जीवसृष्टी...

    22-May-2023
Total Views |

biodiversity


जैवविविधता म्हणजे सजीव सृष्टीतील विविधता होय. इ. स. 1968 मध्ये या शब्दाचा प्रथम प्रयोग रेमंड एफ. दासमान या वन्यजीव अभ्यासकाने त्यांच्या एका पुस्तकात केला. यानंतर ही अत्यंत व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना प्रकाशझोतात आली. आपल्या सभोवताली आढळणारा प्रत्येक सजीव जैवविविधतेचा एक भाग आहे. जैवविविधता शब्द उच्चारल्यावर डोळ्यासमोर उभे राहतात असंख्य प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि बरेच काही. अशी ही जैवविविधता अनुभवण्याचा आजचा दिवस. 22 मे हा दिवस सर्वत्र 'जागतिक जैवविविधता दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जैवविविधतेचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) या दिवसाची निवड केली.


काय आहे जैवविविधता दिनाचा इतिहास?

जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा दिवस सुरुवातीला दि. 29 डिसेंबर रोजी साजरा केला जात होता. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने (जनरल असेंब्ली) जैवविविधता दिनाचा ठराव दि. 29 डिसेंबरला संमत केला आणि त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याचे ठरवले. परंतु, त्यानंतर डिसेंबर 2000 साली, 22 मे हा दिवस यासाठी निश्चित करण्यात आला. कारण, दि. 22 मे, 1992 रोजी ‘रिओ परिषदेत’ जैवविविधतेच्या संकल्पनेवर ठराव करण्यात आला होता.

दरवर्षी, एक नवीन संकल्पना (थीम) घेऊन हा दिवस साजरा केला जातो. 2023 ची थीम आहे 'From Agreement to Action: Build Back Biodiversity' म्हणजेच आता आपल्याकडे जागतिक स्तरावर एक कृती आराखडा मान्य झाला आहे, त्यामुळे आपण 2030 पूर्वी कराराने विचारात घेतलेल्या सर्व उपायांची अंमलबजावणी करायला हवीbiodiversityजैवविविधता ही अतिशय रंजक अशी गोष्ट आहे. मुख्यत्वे तीन प्रकारांमध्ये ती आढळून येते - जनुकीय विविधता, प्रजातीय विविधता आणि परिसंस्थीकीय विविधता. समुद्राच्या तळापासून ते माणसाच्या जठरापर्यंत, मोठ्या व्हेल माश्यापासून ते अगदी डोळ्यांना न दिसणार्‍या सूक्ष्मजीवांपर्यंत जैवविविधता सर्वत्र आहे. छोट्याशा मुंगीपासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत सर्व सजीव एकाच जंगलात आनंदाने राहतात. याचे कारण म्हणजे निसर्गाने प्रत्येक सजीवाला एक कार्य ठरवून दिले आहे, त्याप्रमाणे त्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. याला छळलहश (निश) असे म्हणतात. 'निश' म्हणजेच त्या सजीवाची त्या परिसंस्थेतील भूमिका होय. यामध्ये तो काय खातो, कुठे राहतो, कुठे प्रजनन करतो तसेच त्याचा इतर प्रजातींसोबत काय संबंध आहे म्हणजेच थोडक्यात त्या विशिष्ट प्रजातीचा अधिवासाच्या सवयी लक्षात घेणं यासर्व बाबींचा समावेश होतो. या भूमिकेचा आदर राखूनच प्रत्येक सजीव जगत असतो. निसर्गातील अन्नसाखळ्या व अन्नजाळीसुद्धा यानुसारच घडत असतात. जंगल परिसंस्थेचा विचार केल्यास सर्वांत वरच्या जागेवर वाघ आहे. या प्रजातीला ‘अम्ब्रेला स्पिशिज’किंवा ‘अपेक्स प्रिडेटर’ म्हणतात. ज्या जंगल परिसंस्थेमध्ये वाघाचा समावेश आहे, तिच्यातील सजीवांचे प्रमाण अतिशय योग्य असते. त्यातील सजीव हे त्या परिसंस्थेच्या कॅरिंग कॅपॅसिटी एवढेच असतात. अशाप्रकारे व्यवस्थित नियोजन करून निसर्गाचे हे कार्य चाललेले असते.
biodiversityनिसर्गात अशा काही प्रजाती आढळून येतात ज्या काही विशिष्ट प्रकारच्या प्रदेशांतच आढळतात. उदाहरणार्थ केवळ भारतापुरता विचार केल्यास एकशिंगी गेंडा (one horned rhinoceros) केवळ उत्तर पूर्ण भारतात आढळतो. तसेच, सिंहपुच्छ माकड (lion tailed macaque) केवळ पश्चिम घाटात आढळते. या प्रजातींना प्रदेशनिष्ठ प्रजाती किंवा endemic species असे म्हणतात. भारताचा भूभाग एकूण दहा जैवभौगोलिक अधिवासांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक अधिवासाची विविध वैशिष्ट्ये आढळून येतात. तेथील - हवामान, पर्जन्यमान, तापमान या सर्वांवर एखाद्या प्रजातीचा अधिवास अवलंबून असतो.


आपली जैवविविधता वाचविण्यासाठी...
काही कारणास्तव जर एखाद्या प्रदेशामध्ये एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उभी ठाकली, तर त्याची परिणीती एक किंवा अनेक प्रजातींच्या विनाशात होते. याला ती प्रजाती नामशेष होणे किंवा एुींळपलीं होणे असे म्हणतात. आज अनेक प्रजाती नामशेष झालेल्या आहेत, तर काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर (on the verge of extinction) आहेत. निसर्गात करण्यात आलेला मानवी हस्तक्षेप यासाठी बहुतांश प्रमाणात जबाबदार आहे. ‘आययुसीएन’ म्हणजेच ‘इंटरनॅश्नल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर’ ही आंतरराष्ट्रीय संस्था दरवर्षी अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्‍या, दुर्मीळ असलेल्या, नामशेष झालेल्या प्रजातींची यादी जाहीर करत असते. भारतीय राज्यघटनेत या प्रजातींना संवर्धित करण्यासाठी भारत सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली काढण्यात आला होता. या कायद्यांतर्गत वन्यजीवांची तस्करी व इतर गुन्हे आढळल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे.
biodiversity

परिसंस्थेशी विशिष्ट अंतर ठेवून राहणे आजच्या काळात तरी शक्य नाही. आपण केवळ आपल्या आजूबाजूला आढळणार्‍या जैवविविधतेचा आदर करायला हवा. जेव्हा आपल्या सभोवतालच्या वनस्पती प्राणी, पक्षी, कीटकांच्याविषयी आपल्या मनात प्रेमाची भावना निर्माण होईल, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागेल. तेव्हा त्यांचे संवर्धन होण्यास थोडा का होईना हातभार नक्कीच लागेल. तसेच, तेथील स्थानिक जैवविविधता अबाधित राहील. आजच्या जैवविविधता दिनाच्या निमित्ताने आपल्या बाजूचे एखादे जंगल, तलाव किंवा गवताळ प्रदेशाला नक्की भेट द्या. त्यानिमित्ताने आजूबाजूच्या परिसराची माहिती तेथाल जैवविविधतेची माहिती होण्यास नक्की मदत होईल. केवळ निसर्गाची अनुभुती घेणं पुरेसं नाही, तो वाचविण्यासाठी उघड्या डोळ्यांनी केलेले अभ्यासपूर्ण प्रयत्न करून पावले उचलायला हवीत. याच जागतिक जैवविविधता दिनाच्या खर्‍या अर्थाने शुभेच्छा ठरतील !

- सुरभी वालावलकर 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.