उच्च रक्तदाबावर उच्च सकारात्मकतेची मात्रा

    22-May-2023
Total Views |
article on High blood pressure

तणावाचा एक सामान्य आणि सहज न जाणवणारा दुष्परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे सामान्यत: लक्षणे सहज उद्भवत नसल्यामुळे, जेव्हा त्याचा त्रास होतो, तेव्हा लोकांना त्याची सहसा कल्पना येत नाही. म्हणूनच उच्च रक्तदाबाला बरेचदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण, यात कोणतीही चेतावणी देणारी लक्षणे वा चिन्हे दिसत नाहीत. तुम्ही कामावर प्रचंड तणावाखालीआहात. तुमच्या जोडीदारासोबत वादाच्या भोवर्‍यात सापडला आहात. तुमचा मुलगा जीवनमृत्यूच्या युद्धात हरताना दिसत आहे. तुमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. या सर्व उदाहरणांमध्ये, तुम्हालाच शेवटी तणाव आणि चिंतेची शारीरिक लक्षणे दिसू लागतात.

जेव्हा तुम्हाला चिंता, तणाव, भीती, राग किंवा तणाव जाणवतो, तेव्हा, सामान्यतः नकारात्मक विचारांमुळे तुमच्या शरीरातील ‘अ‍ॅड्रेनॅलीन’ आणि ‘कोर्टिसोल’ या तणाव संप्रेरकांचे प्रमाण वाढलेले असते. ‘अ‍ॅड्रेनॅलीन’च्या वाढीमुळे हृदयाची गती, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धमनीच्या भिंतींचे प्रज्वलन आणि रक्त गोठण्याचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा तुमच्या आयुष्यात खूप चिंताजनक आणि तणावपूर्ण गोष्टी घडत असतील, तर या नकारात्मक भावना आणि ‘अ‍ॅड्रेनॅलीन’ची वाढलेली पातळी दीर्घकाळ टिकू शकते. यामुळे तुमच्या बरे होण्यावर आणि तुमच्या एकंदरीत आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या अनुभवाने आलेले शहाणपण सूचित करते की, तणाव आणि चिंतादेखील तुमचा रक्तदाब वाढवते. लोकांचा असा समज आहे की, ताणामुळे उच्च रक्तदाब होतो.

काही शास्त्रज्ञांच्या मते, तणाव हे उच्च रक्तदाबाचे थेट कारण नाही. प्रत्यक्षात तणाव हे एक क्षणिक कारण आहे. उदा. तुम्हाला एक वाईट फोन येतो आणि तुमचा रक्तदाब वाढतो; तुम्ही आराम केल्यानंतर, तो शांत होते. जेव्हा तुम्ही दीर्घकाळ तणावग्रस्त असता, तेव्हा तुम्ही ज्या निरोगी सवयींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, ते ना करता सिगारेट ओढणे, दारू पिणे व खादाडणे या घातक सवयीमध्ये गुंतता, ज्या उच्च रक्तदाबासाठी अपायकारक आहेत. त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा फिरायला जाण्यासाठी, हलके व्यायाम करण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी प्रेरणा मिळवणे तुम्हाला कठीण जाते. जेव्हा तुम्ही उच्च रक्तदाबाचा विचार करता, तेव्हा तुम्ही मानसिक आरोग्याच्या विकारांबद्दल विचार करू शकत नाही. परंतु, तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास, सामान्य रक्तदाब असलेल्या लोकांपेक्षा चिंता आणि नैराश्य यांसारख्या भावनिक समस्या अनुभवण्याची शक्यता अधिक असते.

आपण स्वतःला दुसर्‍या स्ट्रोकपासून वाचवू शकतो, ही धारणा व्यक्तीच्या आत्मकार्यक्षमतेचे सामर्थ्य किंवा एखादी विशिष्ट गोष्ट आपण साध्य करू शकतो, या निर्धारावर विश्वास दर्शवते. न्यूयॉर्क शहरातील एका अभ्यासात चार हॉस्पिटलमध्ये ५५२ स्ट्रोकच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यांना प्रत्येकाला विचारण्यात आले की, ‘मी स्ट्रोक होण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतो’ या विधानाशी ते सहमत आहेत का? एका वर्षानंतर ज्या महिलांना विश्वास होता की, त्या त्यांचा रक्तदाब कमी करू शकतात व स्ट्रोक होण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात, त्यांचे रक्तदाब सरासरी ५.६ मिमी/एचजी खरोखर कमी झाले होते. पण, ज्यांना विश्वास नव्हता, त्या मात्र त्यांचा रक्तदाब कमी झाला नव्हत्या.

आरोग्यावरील आपला सकारात्मक विश्वास उपचारावरील परिणाम का सुधारू शकतात, याची अनेक तांत्रिक आणि मानसिक कारणे आहेत. या अभ्यासाचे लेखक डॉक्टर गोल्डमन लिहितात- “सकारात्मक आरोग्यावर विश्वास असणार्‍या व्यक्तीकडे उच्च पातळीची स्वयं-कार्यक्षमता आणि आत्मविश्वास, कृती करण्याची प्रेरणा, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची अधिक क्षमता असते. या व्यक्तीस रोगाच्या जोखिमेची अचूक समज असून ती आपल्या निरोगी वर्तनांना (उदा, आहार,शारीरिक क्रियाकलाप, झोप, आणि उपचारांचे नियमित पालन) प्रोत्साहन देऊ शकते आणि परिणामी चांगले आरोग्य प्राप्त करू शकते. याव्यतिरिक्त, सकारात्मक भावना आरोग्यावरील तणावाचाघातक प्रभाव बफर करू शकतात किंवा तणाव स्वतःच नियंत्रित करू शकतात.

संशोधकांचा असा विश्वास आहे की, हे विज्ञाननिष्ठ निष्कर्ष मानसिक आरोग्य आणि उच्चरक्तदाबाची कारणे यांच्यातील दुव्याबद्दल नवीन विचारांचा पाया घालतात. मेंदूमध्ये जी जी शास्त्रीय घडामोड घडते, त्याचा प्रभाव शरीरावरपडतो, यावर आज शंका उरली नाही. अनेक अभ्यासांनी सकारात्मक दृष्टिकोन असणे आणि कमी रक्तदाब, कमी हृदयरोग, चांगले वजन नियंत्रण आणि रक्तातील साखरेची निरोगी पातळी यांसारखे आरोग्य फायदे यांच्यात एक निर्विवाद दुवा दर्शविला आहे. नैराश्य आणि उच्चरक्तदाबाच्या व्यापक आजारांसाठी, मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या परस्परसंवादावर लक्ष केंद्रित करणार्‍या थेरपी आणि प्रतिबंधासाठी दृष्टिकोनातील असा बदल उपचाराचे नवीन प्रमाण सक्षम करू शकतो.

सकारात्मक दृष्टिकोनामुळे उच्च रक्तदाब का नियंत्रित होऊ शकतो, याचे एक कारण म्हणजे जे लोक आनंदी असतात, त्यांना जास्त काळ विश्रांती मिळते. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याला फायदा होतो, ते तणावपूर्ण घटनांमधून अधिक लवकर बरे होऊ शकतात. तुमचा ताण कमी करण्यासाठी, त्याला कारणीभूत असलेल्या काही गोष्टी जीवनातूनकाढून टाकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. अर्थात, जेव्हा तुमचा मुख्य ताण तुमची स्वतःची नोकरी किंवा तुमचा कुटुंबातील सदस्य असेल, तेव्हा असे म्हणणे करण्यापेक्षा सोपे आहे. या प्रकरणांमध्ये, मानसोपचार, तुम्हाला तुमच्या तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात.

सकारात्मक मनोवैज्ञानिक भाव असलेल्या लोकांमध्ये मनोसामाजिक संसाधने अधिक दिसून येतात आणि त्यामुळे त्यांचे सर्वसामान्य शारीरिक आरोग्य चांगले का असते, हे आपल्याला कळू शकते. एखादी व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु, त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचारांच्या सामर्थ्यासाठी तयार होते, तेव्हा ती स्वत:ला बदलण्यासाठी सक्षम होते. जर नकारात्मक घटक आयुष्यात बराच काळ टिकून राहिल्यास, ते राग, नैराश्य, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढवतात आणि त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

सकारात्मक विचार ही सतत परिश्रम, आत्मनिर्णय, कठोर परिश्रम आणि चिकाटीची एक संकल्पना आहे आणि या काही एक रात्रीत मिळवण्याची गोष्ट नाही. आयुष्याच्या प्रकाशाकडे पाहा. प्रत्येक दिवस चांगला नसला तरी,प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते. पेला अर्धा भरलेला पाहा, अर्धा रिकामा नाही. यासारखे विचार, ज्यांना कधीकधी टोकाचा आशावाद म्हटले जाते, ते एखाद्याचा उत्साह नुसताच वाढवण्यापेक्षा बरेच काही भरीव चमत्कारी करू शकतात, ते आरोग्य खरोखर सुधारू शकतात आणि आयुष्य वाढवू शकतात. कुटुंब, मित्रमंडळी आणि समवयस्कांशी चांगले आणि निरोगी संबंध राखणे, जीवनाचा एक भाग म्हणून कुठलाही बदल स्वीकारणे आणि ते स्वीकारल्यावर समस्या नाहीशा होतील किंवा कोणीतरी त्यांचे निराकरण करेल, या आशेवर न राहता त्यावर विधायक कारवाई करणे, हे आशादायक व्यक्तींसाठी काहीतरी वेगळे करण्याचे मार्ग आहेत. आनंद आणि आशावाद हे दोन्ही हृदयविकार, रक्तदाब आणि स्ट्रोकच्या कमी जोखमीशी जोडलेले आहेत. ज्याचा सर्वांत जास्त फायदा सर्वांत आशावादी लोकांना होतो. लहान लहान बदलांमुळे रक्तदाब नियंत्रित करण्यात खूप फरक पडू शकतो. दररोज छोट्या छोट्या निरोगी गोष्टी करून प्रारंभ करा.

डॉ. शुभांगी पारकर 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.