नागरिकांनी बँकांकडे धाव घेऊ नये : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

दोन हजार रुपयांच्या ‘नोटा कायदेशीर’ निविदा म्हणून कायम राहणार

    22-May-2023
Total Views |
Reserve Bank of india Governor Shaktikanta Das

नवी दिल्ली
: दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतरही कायदेशीर निविदा म्हणून कायम राहणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी त्यांच्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी तातडीने बँकांकडे धाव घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सोमवारी केले आहे.

आरबीआयने दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सर्व शंकांचे निरसन केले आहे. ते म्हणाले, दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढण्यात येत असल्या तरीही त्यांची कायदेशीर निविदा कायम राहणार आहे. बँकांना या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून तोपर्यंत बहुतांशी नोटा या परत येतील. त्यानंतर तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.

नागरिकांना नोटा बदलून जवळपास तीन ते साडेतीन महिन्यांचा अवधी देण्यात आला असून त्यांनी बँकांकडे धाव घेऊ नये, असे आवाहन दास यांनी केले. ते पुढे म्हणाले, ५०० आणि १००० रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर २ हजार रुपये मूल्याच्या नोटा अर्थव्यवस्थेतील तरलता वाढविण्यासाठी जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता अन्य मूल्यांच्या चलनाच्या नोटा पुरेशा प्रमाणात असल्याने २ हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे चलनही आता ५० टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे या नोटा चलनातून काढण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.