चीनच्या मुसक्या आवळणार ; ‘क्वाड’ परिषदेत सदस्य देशांचा निर्धार

22 May 2023 10:00:30
Quad against china Xi Jinping

हिरोशिमा
: बळजबरीने स्थिती बदलू पाहणार्‍या चीनच्या कारवायांना रोखणे काळाची गरज असल्याचे एकमत ‘क्वाड’ परिषदेतील सदस्य देशांनी करत आगळीक करणार्‍या देशाचा तीव्र निषेध केला आहे. वातावरण बिघडवू पाहणार्‍या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत सदस्य देशांनी यावेळी चर्चा केली. भारतीय सीमेवर चीनकडून सातत्याने कुरघोडी केली जात आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या या देशाने इतर अनेक गरीब देशांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या या धोरणाचा ‘क्वाड’ देशाने कडाडून विरोध केला आहे. ‘क्वाड’ परिषदेत सदस्य देशांनी नाव न घेता चीनला थेट इशारा दिला आहे.

भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश सहभागी असलेल्या ‘क्वाड’ची जपानच्या हिरोशिमा येथे परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज हजर होते. सहभागी देशांनी चीनच्या कुरघोड्यांवर टीका केली आहे. आम्ही बळजबरीने किंवा बळजबरी करून स्थिती बदलू पाहणार्‍या अस्थिर किंवा एकतर्फी कृतींचा तीव्र विरोध करतो, असे त्यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. “युक्रेन आणि रशिया युद्ध हे मोठं प्रकरण आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. हा फक्त एक मुद्दा आहे अशी माझी धारणा नाही. माझ्यासाठी तर हे युद्ध म्हणजे अर्थव्यवस्था, राजकारण आणि माणुसकी यांच्यावर परिणाम करणारं आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जपानच्या हिरोशिमा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संवाद झाला. त्यावेळी मोदींनी युक्रेन युद्धाचा जागतिक परिणाम उद्गार काढले. पंतप्रधान मोदी झेलेंस्कींना म्हणाले, “भारत देश आणि मी युद्धावर काही तोडगा काढता येईल का? यासाठी तुम्हाला सहकार्य करू इच्छितो. युद्धाचं दुःख काय असतं ते तुम्हाला माहीत आहे,” असेही ते म्हणाले. या चर्चेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध संपलेलं नाही. याआधी पंतप्रधान मोदी यांनी झेलेंस्कीशी फोनवरून चर्चा केली होती. आता मात्र या दोन्ही नेत्यांनी समोरासमोर एकमेकांशी चर्चा केली. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून रशिया विरुद्ध युक्रेन असं युद्ध सुरू आहे. रशियाने एका विशेष सैन्य मोहिमेचं नाव देत युक्रेनवर हल्ला सुरू केला. युक्रेनवर हल्ला झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेंस्की यांची ही पहिलीच भेट आहे. त्याआधी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी काहीवेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून युद्धात हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.
Powered By Sangraha 9.0