कर्नाटक काँग्रेस सरकारच्या ४ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे; एडीआरच्या अहवालात खुलासा

    22-May-2023
Total Views |
Karnataka Congress ministers fighting serious criminal case

 नवी दिल्ली
: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व ९ मंत्र्यांवर गुन्हे असून त्यापैकी ४ मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती ही २२९ कोटी रुपये आहे, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) आणि कर्नाटक इलेक्शन वॉचच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून तूर्तास मार्ग काढण्यास काँग्रेसला यश आले आहे. मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली आहे. त्यासोबतच मंत्रिमंडळामध्ये सध्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व म्हणजे ९ मंत्र्यांवर विविध प्रकारची गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित असल्याचे एडीआरच्या अहवालामध्ये पुढे आहे. त्याचप्रमाणे ९ पैकी ४ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक स्थितीदेखील कोट्यधीश प्रकारातील असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मंत्रिमंडळातील ९ पैकी ९ मंत्री हे कोट्यधीश असून मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती ही २२९.२७ कोटी रुपये आहे. सर्वाधिक १४१३.८० रुपयांची संपत्ती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घोषित केली आहे तर सर्वांत कमी १६.८३ कोटी रुपयांची घोषित संपत्ती प्रियांक खर्गे यांनी घोषित केली आहे.

विशेष म्हणजे कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही. त्याचप्रमाणे ३ मंत्र्यांचे शिक्षण ८ ते १२ दरम्यान असून उर्वरित ६ मंत्र्यांनी पदवी ते पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.