श्रीनगरमध्ये जी२० पर्यटन कार्यगटाच्या बैठकीस प्रारंभ

22 May 2023 19:08:28
G20 summit in Srinagar


नवी दिल्ली
: भारताच्या जी२० अध्यक्षतेखालील पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकी सोमवारपासून जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जी२० पर्यटन गटाच्या कार्यसमुह बैठकीचे उद्घाटन जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी सदस्य २० देशातील ६०हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. या बैठकीत हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, स्किलिंग, पर्यटन एमएसएमई आणि डेस्टिनेशन या पाच परस्पर प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा होईल. पर्यटन क्षेत्राच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी आणि 2030 एसडीजीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे प्राधान्यक्रम महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त, आर्थिक विकास, पर्यावरण पर्यटन आणि सांस्कृतिक संरक्षणासाठी चित्रपट पर्यटनावर अनेक साइड इव्हेंट्स देखील असतील. तिसर्‍या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीदरम्यान प्रतिनिधी स्थानिक हस्तकला, कारागिरांचे कार्य, समुदायाच्या सहभागाचे महत्त्व याविषयी सरकारद्वारे आयोजित केलेल्या कला आणि हस्तकला बाजाराला भेट देणार आहेत. या बैठकीत ६० विदेशी प्रतिनिधींशिवाय देशभरातून पर्यटनाशी संबंधित विविध संस्थांचे सुमारे ६५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बुधवारी बैठकीच्या शेवटच्या दिवशी सर्व पाहुणे काश्मीरमधील सकारात्मक बदल अनुभवण्यासाठी पोलो व्ह्यू, झेलम रिव्हर फ्रंट आणि श्रीनगर शहरातील इतर काही ठिकाणांना भेट देतील.

चित्रपट पर्यटनाबाबत राष्ट्रीय धोरण

पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटांच्या भूमिकेचा उपयोग करण्यासाठी रोडमॅप प्रदान करण्यासाठी 'चित्रपट पर्यटनावरील राष्ट्रीय धोरण' मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये जम्मू – काश्मीरचा प्रमुख वाटा असणार आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.



Powered By Sangraha 9.0