निसर्गमित्र भाई

21 May 2023 20:34:42
article on Sudhir Risbud

निसर्गात रमणारे, कातळ शिल्पे, फुलपाखरे, पक्षी यांच्या गोष्टी तळमळीने सांगणारे, निसर्ग आणि इतिहास यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे भाई म्हणजेच सुधीर रिसबूड यांच्याविषयी...

माणूस ज्या मातीत जन्म घेतो, त्या मातीचं ऋण घेऊन तो जन्मभर जगतो. त्याच्या जगण्यात तेथील निसर्गाचं निखळ प्रतिबिंब पडलेलं असतं. स्थलांतर हा जसा निसर्गनियम तसंच आपल्या जन्मभूमीचा वारसा आपल्यासोबत नव्या जागी घेऊन जाणं हा मनुष्याचा स्थायीभाव. काही माणसं मात्र आपल्या या रम्य बालपणात आयुष्यभर रमतात. त्यांना भरकटण्याची ओढ लागत नाही. सुधीर यांचा जन्म रत्नागिरीत झाला. तळकोकणाला सौंदर्याचा वारसा निसर्गाने सढळहस्ते बहाल केलेला आहे. समुद्रकिनारे, सडे, सदाहरित नारळी पोफळीच्या बागा, या भूमीत आदिम कोकणी माणसाने आपली कला मुक्तहस्ते उधळली.

रत्नागिरीत जांभळा दगड. लालसर रंगाचे पाणी साठवून ठेवण्याची मोठी क्षमता असणारा त्यामुळेच काहीसा मृदू. कोरवी काम करायला तुलनेत सोपा. या दगडाचे बनलेले लांबलचक मोकळे सडे हेरून त्यांचाच कॅनव्हास केला. गूढ, नयनरम्य आणि कलात्मक कातळ खोद शिल्प मोठ्या प्रमाणावर तयार झाली. आपला कल्पनाविस्तार, समजुती, श्रद्धा, स्वप्न आपल्या दोन हातांनी त्याने या चिर्‍यांवर कोरून काढल्या, असे अनेक कातळ खोद शिल्प भाईंनी शोधून काढले. शालेय मुलांच्या सहली नेऊन अभ्यास सफरीचे आयोजन केले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राबवण्यात येणार्‍या ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ या उपक्रमात त्यांनी विशेष सहभाग नोंदवला. अनेक शाळांत, महाविद्यालयांत त्यांनी व्याख्याने दिली. अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी ‘सुरक्षा विषयक’ लेख लिहून जनजागृती केली. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्मिती व जुन्या वास्तूंचे संवर्धन परंपरागत व अपरंपरागत बांधकाम आधारित कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सहभागी व्हायला सुरुवात केली. बालवयातच त्यांना इतिहास, पुरातन मंदिरे, गड-किल्ले, पक्षी निरीक्षण याविषयी आवड निर्माण झाली. सुधीर यांनी ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. व्यवसायाने ते शासनमान्य ठेकेदार म्हणनू २२ वर्ष कार्य करत आहेत. परंतु, इतिहासाची तसेच पुरातन वास्तूंची ओढ त्यांना कातळशिल्पांकडे घेऊन गेली.

माणसाला जन्मतः प्राप्त झालेली विजिगिषु वृत्ती तिच्यापासून जोपासलेली उत्सुकता, उत्कंठा ज्याचं प्रतिबिंब म्हणजे उत्कटता त्याला सतत प्रश्न उपस्थित करायला भाग पाडते. त्या प्रश्नांची उत्तरे शोधत निघालेली ही जिज्ञासू माणसे आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार करतात, समाजाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. या नावीन्याची, कलेची आसक्ती माणसाला असतेच, लोकांचा ओढा साहजिकच या शिल्पांकडे वळू लागला, असे करत सुधीर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७२ गावांतून १६०० पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळ खोद चित्रांचा शोध घेतला. त्यांच्यासोबत धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई हेही यासाठी सक्रिय होते. तसेच, त्यानंतर त्यांनी ‘आडवळणाचे कोकण’ या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत त्यांच्या अभ्यास मोहिमा सतत चालू असतात.

केवळ कातळशिल्प नाही, तर पक्षी, फुलपाखरे यांचीही भुरळ त्यांना पडली. चिकित्सक स्वभावाला रंगांचं आकर्षण ही स्वाभाविकता. त्यांचे पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीही नियमित सुरू असते. आजपर्यंत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून विविध जाती व वेगवेगळ्या प्रजातींच्या ३६० पेक्षा अधिक पक्ष्यांचा वेध घेतला आहे. त्यात केवळ रत्नागिरीतूनच जवळपास ४२० पक्षी शोधले आहेत. रत्नागिरीतूनच नवीन १३० फुलपाखरांच्या प्रजातीही त्यांनी नोंदवल्या आहेत. तसेच, १०० पेक्षा अधिक प्रकारची कातळ फुले शोधली आहेत आणि त्यांचा हाच प्रवास आज १७ वर्षे अविरत चालू आहे. त्यांची ‘कोकणातील पक्षी’ ही दोन भागांतील पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

इतर ठिकाणी सापडणारे पेट्रोग्लीप्स दगडांवर, गुहेत, डोंगरावर खोदलेले आहेत. परंतु, हेच कोकणात सपाट भूभागावर कोरले आहेत. त्यांच्या या अभ्यासातून मानवी उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्याची माहिती समोर आली आहे. ज्यातून तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ लावणे शक्य होणार आहे. तसेच, द्वितीयक जांभा दगडात मोठ्या प्रमाणावर चुंबकीय विस्थापनाचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे. पण तरीही ‘कातळ खोद शिल्प’ या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. अंदाजे ३५ हजार वर्षे जुनी कातळ शिल्प त्यांनी शोधून काढली आहेत.

त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्याचा उचित गौरव अनेकांनी यापूर्वी केला आहे. अनेक संस्थांमार्फत त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पक्षी जीवनावरील कार्याबद्दल आरोही संस्था, चिपळूण, ‘नेचर वॉक’ संस्था, पुणे, तसेच महाराष्ट्र वन विभागाकडूनही त्यांचा गौरव झाला आहे. ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ या उपक्रमात केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा गौरव झाला आहे. ‘महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट’कडून ‘पर्यटन मित्र’ म्हणूनही त्यांचा सन्मान झाला आहे. त्याचबरोबर मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे हे कार्य आवाहतपणे सुरू राहावे, अशी प्रार्थना करत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने त्यांना अनेकानेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0