‘कालिदास’चे शुक्लकाष्ट

    21-May-2023
Total Views |
Mahakavi Kalidas Kalamandir Cultural Centre Nashik

नाशिक येथील सांस्कृतिक केंद्र ‘महाकवी कालिदास कलामंदिरा’चे ’स्मार्ट सिटी’अंतर्गत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केल्यानंतरही नाट्यमंदिराचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव नाही. रविवार, १४ मे रोजी ’कालिदास कलामंदिरा’त एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग सुरू असताना ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यावेळी कलामंदिराचे व्यवस्थापक कहाणे जागेवर नव्हते. शिवाय, याप्रकरणी महापालिकेलाही कुणी याची माहिती दिली नाही. दुसर्‍या दिवशी माध्यमांमधून याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेला यासंबंधी माहिती समजली. महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा विभागीय महसूल आयुक्त यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ‘कालिदास’चे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. हे योग्यच केले! ’महाकवि कलिदास कलामंदिरा’सह तारांगण आणि फाळके स्मारक विभागाची जबाबदारी विद्युत विभागाचे उपअभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह इतर अभियंत्याकडे सोपवली गेली, हे एका दृष्टीने बरेच झाले. नाशिकमध्ये प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होत असतात. इतकेच नव्हे, तर व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या नाटकांचे पर्दापणाचे प्रयोग राज्यात प्रथम नाशिकमध्येच होतात, असे असताना कलामंदिराची दुरवस्था दुर्लक्ष करण्याजोगी नव्हतीच. व्यावसायिक नाटकांचे तिकीट चित्रपटांपेक्षा अधिक असूनही, कालिदासची दुरवस्था थांबण्याचे नाव नव्हते. दुरवस्थेचा हा ‘विलंबित एकताल’ संपण्याचे चिन्ह थांबत नसल्याने रसिकांनी, नाट्य कलाकारांनाही याच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठवला होता. व्यवस्थापकावर कारवाई केल्यानंतर नाट्यगृहासंबंधित इतरांवरही वचक बसणार आहे. दरम्यान, वातानुकूलिन यंत्रणा प्रकरणानंतर कलामंदिरातील नादुरूस्त ‘सीसीटीव्ही‘ कॅमेर्‍यांची दुरूस्ती आणि वातानुकूलिन यंत्रणा कक्षातही ‘सीसीटीव्ही‘ बसवण्यात आल्याने ही इष्टापत्ती ठरली. दरम्यान, त्र्यंबकरोडवरील महत्त्वाकांक्षी स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरमधील वातानुकूलित यंत्रणाही दुरूस्त झाल्याने त्याचेही नाशिककर स्वागत करत असून, तारांगण भेटी देण्यासही गर्दी वाढल्याचे सुखद चित्र आहे. ती आता अबाधित राहावी ही अपेक्षा!

अतिक्रमण मोहिमेचा स्तुत्य ‘धडाका’

नाशिक शहरातील रस्त्यांवर अधिकृत बांधकामे, अतिक्रमणांचा विळखा वाढत गेल्याने रस्तेकोंडी आणि पादचार्‍यांसह वाहतुकीचीहीसमस्या निर्माण झाली. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शालिमार जवळील तब्बल २४ ते २५ वर्ष जुनी असलेली दुकाने जमिनदोस्त करून मोठी कारवाई केली. त्यानंतर दोन आठवडे महापालिकेने शहरातील सर्वच प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि चौकातील अतिक्रमणे काढण्याचे स्तुत्य काम झाले. नाशिकमध्ये ‘कोविड’काळानंतर अतिक्रमणांमध्ये लक्षणीय वाढ झाली. ‘कोविड’ युगांतरानंतर अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, आर्थिक मंदी यामुळे अनेकांचे संसार जसे रस्त्यावर आले, तसेच अनेकांनी रस्त्यावरच धंदेही उघडले. साहजिकच रस्त्यांवर थाटलेल्या छोट्या-मोठ्या टपर्‍या, हातगाडीवाले यामुळे नाशिकमधील जवळपास सर्वच रस्त्यांचा श्वास कोंडला. वाढत्या अतिक्रमणांविरोधात सुजाण नागरिकांसह अनेकांनी तक्रारीही केल्या. त्यावर कारवाई झाली नाही. साहजिकच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अरुणा डहाळे यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला गेला. या पाश्वर्र्भूमीवीर डहाळे यांनी झपाटल्यासारखे काम करत अनेक अतिक्रमणे काढल्याने नागरिकांनी कारवाईचे कौतुक केले. गेल्या आठवड्यापासून शहरातील शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा या मध्यवर्ती बाजारपेठेसह, नाशिक रोड, सातपूर, बिटको चौक, नवीन नाशिक आदी भागातील अतिक्रमणांवर महापालिकेने हातोडा चालवून मोठी कारवाई केली. त्यामध्ये मोठी पक्की बांधकामे पांडण्यासह, छोटी घरे, बांधकामे, पक्के ओटे आदी पाडल्याने शहराने मोकळा ’श्वास’ घेतला. महापालिकेने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी सुमारे २३८ हून अधिक अतिक्रमणे काढून घेतली. यानंतर शहरातील चौका, बाजारपेठा आणि रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाही, यासाठी नागरिकांमध्ये जागृती आवश्यक आहे. दरम्यान, यंदा अतिक्रमणे काढण्याचा खर्च महापालिकेने संबंधित अतिक्रमण धारकांकडून वसूल केल्याने आता, तरी कायद्याचा धाक बसल्याने छोटे व्यावसायिक, दुकानदार, अतिक्रमणे करणार नाहीत ही अपेक्षा.!
 
निल कुलकर्णी 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.