मधमाशापालनातून राज्यात मधुक्रांती आणणार

21 May 2023 22:33:02
Madhumitra Award show on World Bee Day

पुणे
: “ ‘मधाचे गाव’ ही संकल्पना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवून मधमाशा पालन हा उद्योग राज्यात मधुक्रांती आणेल,”असा विश्वास खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केला आहे.मध संचालनालय महाबळेश्वर येथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त आयोजित ‘मधुमित्र पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.

वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, विद्यासागर हिरमुखे, बिपीन जगताप, डी. आर. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात साठे पुढे म्हणाले, “राज्यातील भौगोलिक वातावरण मधमाशांना अत्यंत उपयुक्त आहे.

मधमाशापालन हा शेतकर्‍यांना खूप फायदेशीर उद्योग आहे. राज्यात मधउद्योग वाढवून मधुक्रांतीसाठी सर्वांनी या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.”अंशू सिन्हा म्हणाल्या, “ ‘मध केंद्र योजना’ प्रभावी राबविण्यासाठी ‘मधाचे गाव’ही संकल्पना महत्त्वाची आहे. शेतकरी वर्गाने या उद्योगातून प्रगती करावी.” या कार्यक्रमात मधमाशा पालनात प्रभावी काम करणार्‍या मधपाळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात मधुसखी हा पहिला पुरस्कार पाटण येथील रोहिणी पाटील यांना देण्यात आला, तर दुसरा पुरस्कार लातूरचे दिनकर पाटील आणि तिसरा पुरस्कार अमरावती येथील सुनील भालेराव यांना देण्यात आला. यावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या लोकांचादेखील सन्मान करण्यात आला.

मध संचनालयातील प्रक्रिया विभाग आणि ‘हनी पार्क’चे उद्घाटन साठे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत डी. आर. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन बिपीन जगताप यांनी केले, तर रमेश सुरुंग यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0