‘नाफेड’ मार्फत कांदा खरेदी लवकरच होणार सुरू : डॉ भारती पवार

    21-May-2023
Total Views |
Dr Bharti Pawar nafed dicision

लासलगाव
: राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’ मार्फत लवकरच उन्हाळ कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली. या हंगामात कांद्याच्या घसरत्या दरांमुळे शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्या अनुषंगाने ‘नाफेड’ने प्रथमच लाल कांद्याची खरेदी सुरू केली. आता उन्हाळ कांद्याची देखील खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलली आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत डॉ. पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सध्याच्या स्थितीत कांद्याच्या किंमती पडल्या आहेत.ही स्थिती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी अशी मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे डॉ भारती पवार यांनी निवेनाद्वारे केली होती. राज्यात ग्राहक व्यवहार विभाग व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक तयार केला जातो. यासाठी ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उदिष्ट असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, सुनील डचके, कांदा व्यापारी मनोज जैन, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा..

अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या दिलासा मिळावा,यासाठी देखील केंद्रीय मंत्री गोयल यांच्या सोबत चर्चा झाली आहे.दरम्यान लवकरच नाफेड मार्फत उन्हाळ कांदा खरेदी सुरू होणार आहे.
डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.