नोटाबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही : राज ठाकरे

20 May 2023 17:17:46
raj thackeray

नाशिक
: नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. त्याचप्रमाणे, २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? असा खडा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरही यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. तसेच त्यांनी यावेळी बोलताना माहीमच्या दर्ग्याचा दाखला दिला. ठाकरे म्हणाले, माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो. त्याचबरोबर इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? असा खरमरीत प्रश्न विचारत मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय असे वक्तव्य राज ठाकरेंनी नाशिक दौऱ्यात केले.

त्याचप्रमाणे, धर्मावर वाद घालणाऱ्या लोकांचादेखील त्यांनी समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोकं कोत्या मनोवृत्तीची तसेच त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. ह्यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का? असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरे म्हणाले, ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. म्हणून मी त्रास देणाऱ्या मशिदींवरच्या भोंग्यांवर बोललो. माहीम समुद्रातील मजारीवर बोललो... गडकिल्ल्यांवर पण काही ठिकाणी अनधिकृत दर्गे उभे राहतात तेही हटवलेच पाहिजेत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0