पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी-७ बैठकीनिमित्त हिरोशिमाला भेट

20 May 2023 14:57:46
narendra modi

हिरोशिमा
: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ च्या बैठकीनिमित्त जपानच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी यावेळी हिरोशिमा येथे जाऊन भेट दिली. तिथे त्यांनी भारतीय लोकांशी संवाददेखील साधला. १९७४ नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांनी दुसऱ्या महायुध्दात बेचिराख झालेल्या हिरोशिमाला भेट दिली आहे. दरम्यान, जी-७ देशांची बैठक हिरोशिमा येथे आयोजित करण्यात आली आहे.

"हिरोशिमाला पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपानी मीडिया हाऊस निक्केई एशियाला मुलाखत दिली. त्यात त्यांनी भारताला शेजारी देशांशी चांगले संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. यामध्ये दहशतवाद आणि शत्रुत्व विसरून एकत्र काम करण्याची जबाबदारी शेजारी राष्ट्रांची आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केले.

चीनबाबत पीएम मोदी म्हणाले की, भारत आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आणि तयार आहे. पीएम मोदी म्हणाले की, “चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आवश्यक आहे. भारत-चीन संबंधांचा भविष्यातील विकास केवळ परस्पर आदर, संवेदनशीलता आणि हितसंबंधांवर आधारित असू शकतो. याचा फायदा केवळ या प्रदेशालाच नाही तर संपूर्ण जगाला होईल.”

१९७४ मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर हिरोशिमा, जपानला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ मध्ये हिरोशिमाला भेट दिली होती.

Powered By Sangraha 9.0