भारतात पुढील वर्षी क्वाड शिखर परिषदेचे आयोजन : पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

20 May 2023 19:36:11
g7

नवी दिल्ली
: हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रासह जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्वाड हे अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मानव कल्याणासाठी क्वाड सदैव कार्यरत असून पुढील वर्षी भारतामध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा येथे आयोजित क्वाड परिषदेत शनिवारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले. जपानमधील हिरोशीमा येथे क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी क्वाड हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे हिंद – प्रशांत महासागर क्षेत्र हे जगासाठी व्यापार, नावीन्य आणि वाढीचे इंजिन आहे. हिंद – प्रशांत महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि यश हे जगासाठीही महत्त्वाचे आहे. विधायक अजेंडा घेऊन क्वाड सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित पुढे जात आहे. सामायिक प्रयत्नांसह क्वाड मुक्त, मुक्त आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनाला व्यावहारिक परिमाण देत आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी म्हमजे २०२४ साली क्वाड शिखर परिषदेचे आयोजन भारतात करण्यात येणार असून त्यातही जागतिक शांतता आणि स्थैर्यास प्राधान्य असेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये आयोजित जी ७ शिखर परिषदेच्या दोन सत्रांनाही संबोधित केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणारी चिवट आरोग्य सेवा व्यवस्था उभारण्याला आपले प्राधान्य असले पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक आरोग्यसेवा हा आपला मूलमंत्र असला असावा, पारंपारिक औषधांचा प्रसार, विस्तार आणि संयुक्त संशोधन हे आपल्या सहकार्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्याचप्रमाणे एक वसुंधरा - एक आरोग्य हा आपला सिद्धांत, आणि डिजिटल आरोग्य, सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती हे आपले ध्येय असले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

युक्रेनच्या पंतप्रधानांसोबतही चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेदरम्यान युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या आहे. संपूर्ण जगावरही त्याचे अनेक परिणाम झाले आहेत. हा राजकारणाचा नाही तर मानवतेचा मुद्दा असल्याचे भारताचे मत. यावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि वैयक्तिकरित्या आम्ही आमच्यासाठी जे काही शक्य आहे ते नक्कीच करू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांना दिले. युक्रेन – रशिया संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

विविध देशांसोबत द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार आणि आर्थिक क्षेत्र; नागरी विमान वाहतूक, नवीकरणीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण क्षेत्रातील सह-उत्पादन आणि उत्पादन, तसेच नागरी आण्विक सहकार्य, यासारख्या विविध क्षेत्रांमधील आपल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि यामधील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. नवीन क्षेत्रांमधील भागीदारी वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्यासोबत हिंद- प्रशांत क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी देखील चर्चा झाली. द्विपक्षीय विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन, पर्यावरणपूरक जीवनशैली, हरित हायड्रोजन, उच्च तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, इत्यादी क्षेत्रांवर बैठकीत चर्चा झाली. दहशतवादाचा मुकाबला आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

कोरिया कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्यासोबत व्यापार आणि गुंतवणूक, उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादन, संरक्षण, सेमी कंडक्टर्स आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारविनिमय केला. व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यासोबतच्या चर्चेत द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील प्रगतीचा आढावा घेतला. उच्च स्तरीय आदानप्रदान करण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील बंध अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
Powered By Sangraha 9.0