'मोदी सरकारचे काम आणि हिंदुत्वाचे नाव' राज्यभर राबवा

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याचे भाजप नेतृत्वाचे आदेश

    20-May-2023
Total Views |
bjp

मुंबई
: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पक्षनेतृत्वाने आपल्या संघटना बांधणीसह पक्षाच्या बळकटीकरणावर जोर दिला आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा देखील पार पडला आहे. नड्डा यांचा दौरा संपताच पक्ष नेतृत्वाकडून भाजप नेत्यांना मोदी सरकारने ९ वर्षांत केलेली कामे आणि पक्षाचा कोअर मुद्दा असलेले हिंदुत्व या मुद्द्यांवर राज्यभरात अजेंडा चालवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमकतेने पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेत्यांना आक्रमक होण्याचे आदेश

भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाची भूमिका घेऊनच पुढे जात आहे आणि केवळ हिंदुत्वच नाही तर विकासाच्या मुद्यावरही मोदी सरकारने ९ वर्षांच्या कार्यकाळात नेमकी काय कामे केली आहेत याची इत्यंभूत माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. मोदी सरकारचे काम आणि हिंदुत्वाचे नाव हा अजेंडा घेऊन कार्यकर्त्यांनी राज्यात सक्रियपणे मोहीम राबवावी असे निर्देश नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे भाजपातील सूत्रांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत कार्यक्रम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभरात कार्यक्रमांची आखणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हिंदूंचे सण आणि उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले पाहिजेत अशी भूमिका देखील मांडण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार नितेश राणे, आमदार राम कदम, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यासह काही नेत्यांकडे या विषयांची विशेष जबाबदारी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.