इतिहास श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा...

    20-May-2023
Total Views |
history of Sri Kshetra Trimbakeshwar

स्वतंत्र भारतातील हिंदू धर्मीयांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वरनगरी विश्वविख्यात आहे. भगवान शंकरांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर. येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिणगंगा गोदावरीचा उगम झालेला आहे. हिंदूंचे विशाल स्नेहसंमेलन सिंहस्थ कुंभमेळा येथे दर १२ वर्षांनी संपन्न होत असतो. हिंदुस्थानातील बहुतेक सर्वच पंथांचा या क्षेत्राशी आपुलकीचा संबंध आहे. शैव, वैष्णव, शाक्त, अवधूत, नाथ, भागवत, महानुभाव, पाशुपत इत्यादी अनेक परंपरा येथे अस्तित्वात आहेत. यामुळेच कदाचित असंख्य हिंदूभक्त व भाविकांचे श्रद्धास्थान असलेली ही छोटीशी प्राचीन नगरी अनेकवेळा धार्मिक वादांच्या संदर्भात केंद्रस्थानी दिसून येते. या सप्ताहातही असाच एक नवीन वाद आपण अनुभवला. त्यानिमित्ताने मी आज आपणासमोर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा संक्षिप्त इतिहास सादर करीत आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या गावाचे वैशिष्ट्य फार पुराणकाळापासून दृष्टीस पडते. वैदिक साहित्यातील महामृत्युंजय मंत्राद्वारे वसिष्ठ-वामदेवांनी त्र्यंबकराजांची स्तुती केलेली आहे. ‘न्यायदर्शन’ या वैदिक दर्शनाची निर्मिती महर्षी गौतम यांनी येथील ब्रह्मगिरी पर्वतावर केली, असे सांगितले जाते. स्कंदपुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण अशा अनेक पुराणग्रंथांत त्र्यंबक क्षेत्र महिमा वर्णन केलेला दिसून येतो. आद्य शंकराचार्य, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, ज्ञानेश्वर-नामदेव इत्यादी अनेक संतांच्या साहित्यातून त्र्यंबकेश्वर दर्शन होते. इतिहास ग्रंथ महाभारतात सभापर्व व वनपर्वात गोदावरी आणि त्र्यंबक क्षेत्राचे वर्णन बघता येते.

 
सातवाहन काळातील ‘गाथा सप्तशती’ ग्रंथात गोदावरी नदी व तिच्या प्रदेशाचे वर्णन सर्वाधिक आहे. सातवाहनांच्या शिलालेखातही हे दिसून येते. त्यानंतर येथे अभिर राजांचे राज्य होते, असे शिलालेख/ताम्रपत्रांच्या साहाय्याने आकलन होते. यानंतरचा इतिहास अस्पष्ट आहे. देवगिरीचा राजा रामचंद्र यादव यांच्या काळात त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीला घाट बांधला गेला, असे येथे सांगितले जाते. परंतु, सध्या या घाटांचे अस्तित्व भूतकालीन छायाचित्रांच्या रुपात आहे. गायत्री मंदिराची खंडित वास्तू आजही बघता येते. यावरूनच जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या समूहाची कल्पना करता येऊ शकते. यादवकालीन साहित्यात ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ इ. ग्रंथात जुन्या त्र्यंबकेश्वराचे उल्लेख आढळतात.

अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेवर आक्रमण करून यादवांचे राज्य नष्ट केले व हा भाग मुस्लीम राजवटीत गेला. दिल्लीच्या शहाजहान बादशहाच्या राज्यात इसवी सन १६२२ मध्ये त्र्यंबकचा उल्लेख मिळतो. यापुढे शहाजीराजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्याचे (निजामशहाचे वतीने) दिसून येते. याच काळात शहाजीराजांनी या मंदिराची डागडुजी केली होती, असे जुने लोक सांगतात. मात्र, ही सत्ता फार काळ टिकली नाही. सात-आठ वर्षांतच मुघलांनी नाशिक-त्र्यंबक परिसर जिंकून घेतला. पुढे इ. स.१६७० मध्ये साल्हेर युद्धाच्या वेळी मोरोपंत पिंगळे यांनी हा परिसर स्वराज्यात सामिल केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात मातबरखानाने फितुरीने त्र्यंबकचा किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाने त्र्यंबकची किल्लेदारी करीम कुलीखानाकडे सोपविली. या काळातच त्र्यंबकेश्वरी प्रचंड विध्वंस करण्यात आला. इ. स. १७१६ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मुघलांकडे या किल्ल्याची मागणी केली होती. पण, तिला नकार देण्यात आला. सन १७२०ला हा किल्ला निजामाकडे गेला. इ. स. १७४८-४९ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकगड जिंकून कोळवण मोहिमेला आरंभ केला.

इ. स. १७५४ मध्ये मंदिराच्या अवशेषांवर स्थापन केलेली मशीद पाडून नानासाहेब पेशव्यांनी नव्याने मंदिर बांधण्याची सुरुवात केली इ. स. १७८५ मध्ये सवाई माधवरावांचे काळी हे बांधकाम पूर्ण झाले. याच काळात परधर्मीयांनी नष्ट केलेली मंदिरे, तीर्थे यांचीही मराठा सरदारांनी पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे पेशव्यांनीच निर्माण केलेले असून ब्रिटिश काळात रघुनाथराव विंचुरकरांनी त्याची चुन्याने टीपगारी केली (गळती बंद केली), कळस बसविले व रथ निर्माण करून जमीन दान दिली, असा शिलालेख मंदिरात आहे. या मंदिराच्या निर्मितीत अहिल्यादेवी होळकर यांचे काय योगदान होते, हे स्पष्ट नाही. मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तटबंदीला लागून संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला, असे उल्लेख सापडतात. होळकरांचे सेवक पारनेरकर यांनी कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार केला. सध्याचा सोन्याचा पंचमुखी मुखवटा शिंदे सरकार यांनी अर्पण केला आहे. पेशव्यांचे सर्व सरदार मंडळी, स्वतः पेशवे आणि छत्रपतींचे सर्व वंशज सातारा, कोल्हापूर, नागपूर यांचा उदार आश्रय या प्राचीन तीर्थक्षेत्राला प्राप्त झाल्यामुळे आज या क्षेत्राला नवीन रूप प्राप्त झाले आहे.
 
दि. २४ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांनी तोफांचा भडीमार करून त्र्यंबक किल्ला मराठ्यांकडून घेतला. १८५४ साली इंग्रजांनी लोकसंख्या जास्त नसतानाही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी ’क’ वर्ग नगरपालिकेची निर्मिती केली. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टची इमारत बांधली. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने येथे अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण केल्या आहेत. सध्याही केंद्राच्या प्रसाद योजनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामे सुरु आहेत.



 राजेश दीक्षित

(लेखक ज्योतिर्विद, पुरोहित असून त्यांनी इतिहास विषयात एम. ए. केले आहे.)




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.