माझी टाळी म्हणजे माझा आक्रोश आहे! - श्रीगौरी सावंत

20 May 2023 12:43:09

gappa 
 
मुंबई : "तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा त्या उत्स्फूर्त दाद देण्यासाठी असतात, माझी टाळी हा माझा आक्रोश आहे. पहा माझ्याकडे, माझही एक अस्तित्व आहे, हे सांगणारा आक्रोश. तुमचं लक्ष वेधून घेणारा आक्रोश." समाजसेविका आणि तृतीयपंथी श्रीगौरी सावंत गप्पा सदरातील मुलाखतीत बोलत होत्या. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि प्रयोगशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने '#गप्पा' हे तिसरे प्रकट मुलाखतीचे पर्व रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केले होते. यावेळी आरजे ज्ञानेश्वरी वेलणकर यांनी श्रीगौरी यांची मुलाखत घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ती डॉ. सान्वी जेठवानी यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. मुलाखतीदरम्यान तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांचे जीवनमान आणि इतर माणसांशी असलेलं त्यांचे सामाजिक संबंध अशा विविध विषयांवर संवादिकेने प्रश्न उपस्थित केले.
 
श्रीगौरी पुढे म्हणाल्या, "माझ्यासारख्या कित्येकांचा आक्रोश आज समाजाला ऐकू येत नाही. २०१४ साली सुप्रीम कोटाने आम्हाला सर्व प्रकारची कामे करण्यासाठी संधी दिल्यानंतही महाराष्ट्रात अजूनही तृतीय पंथीयांना नोकरी मिळत नाही. भारतात चंदिगढ व इतर ठिकाणी कित्येक तृतीयपंथी नोकरीसाठी जातात. अजूनही आपल्याकडे टाळी वाजवत येणारे तृतीयपंथी दिसतात, वेश्याव्यवसाय करतात कारण त्यांना तो करावा लागतो. आज माझ्या माहितीत असलेल्या महाराष्ट्रातल्या तृतीयपंथीयांची संख्या २ कोटींच्या वर आहे. परंतु, त्यातील नोंदणी झालेले केवळ २ ते ३ हजार आहेत. या तृतीयपंथीयांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होते. मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथी मुसलमान धर्म स्वीकारतात. अशा तृतीयपंथीयांची ओळख राहत नाही."
 
या कार्यक्रमात त्यांच्या सोबत असलेल्या इतर तृतीयपंथीयांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. श्री गौरी यांना त्यांच्या कुटुंबीयांविषयी आलेले अनुभव सुद्धा त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0