कडोंमपाकडून कर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहीर

20 May 2023 13:02:01
abhay-yojana-of-kdmc-was-announced-by-commissioner


कल्याण
: कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी येणारी थकबाकी वसूल करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महापालिकेस मालमत्ता आणि पाणी पट्टीच्या करापोटी १८०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. या अभय योजनेतंर्गत दिलेल्या मुदतीत थकबाकीदार थकबाकीची रक्कम भरु शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदाऱ्याच्या थकबाकीवर‌ लावण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेत ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे, अशी माहिती कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणी पट्टी करापोटी असलेली कोट्यावधी रुपयांची थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिका प्रशासनाने अभय योजना जाहीर केली आहे. येत्या १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत या अभय योजनेचा लाभ थकबाकीदारांना घेता येणार आहे. या मुदतीत थकबाकीदार त्यांची थकबाकीची रक्कम भरु शकतात. अभय योजना लागू झाल्यापासून दिलेल्या मुदतीत थकबाकीची रक्कम भरल्यास थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेपैकी ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. केवळ २५ टक्केच व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून १८०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी असले तरी १५ जून पासून लागू करण्यात येणाऱ्या या अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत जवळपास २५० कोटी रुपये जमा होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

वाढीव मालमत्ता करापासून नागरीकांची मुक्तता व्हावी याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे,२७ गावातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापालिका हद्दीतील २७ गावांच्या वाढीव मालमत्ता कराच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. नागरीकांची वाढीव करातून मुक्तता होऊन त्यांना दिलासा मिळावा याकरीता अभय योजना लागू करा अशी मागणी युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना अभय योजना लागू करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी महापालिका हद्दीतील थकबाकीदाराकरीता अभय योजना लागू केल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेतील २७ गावांसह कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0