द केरला स्टोरीला प्रोपगंडा म्हणणारे असंवेदनशील

20 May 2023 16:30:07
Vipul Shah on The Kerala Story
 
पुणे : 'द केरला स्टोरी' या सिनेमाला प्रोपोगेंडा फिल्म म्हणून विरोधी प्रचार सुरू केला जात आहे. परंतु, तीन मुलींच्या आयुष्याची खरी गोष्ट पडद्यावर मांडणे हा प्रपोगंडा कसा होऊ शकतो? जे लोक या सिनेमाला प्रोपोगेंडा म्हणत असतील त्यांच्या संवेदनशीलते विषयी प्रश्न उपस्थित केले जाण्याची आवश्यकता असल्याचे परखड मत निर्माता विपुल अमृतलाल शहा यांनी व्यक्त केले.

मिती फिल्म सोसायटीच्यावतीने एफटीआयआयमध्ये 'द केरला स्टोरी' सिनेमाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकीय स्टंटबाजीचे आपण काही करू शकत नाही. सिनेमाचा विरोध ही राजकीय स्टंटबाजीच आहे. आम्ही १५ खटले आतापर्यंत या सिनेमासाठी लढले आहेत आणि सर्वच्या सर्व जिंकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणि सेन्सॉर बोर्डाने आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिक्काम उत्तम केले आहे. जे विरोध करतायेत त्यांचे देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचाही आदर केला पाहिजे. आणि आमचा सिनेमा दाखवतो तो आमची देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

शहा पुढे म्हणाले, सुदीप्तो सेन या सिनेमाची पटकथा घेऊन माझ्याकडे आले त्यावेळेस मी कर्तव्य समजून हा सिनेमा नक्की करायचा, ताकदीने करायचा, अगदी सत्य आणि वास्तविकता दर्शविणारा करायचा असा निर्णय घेतला. आम्ही हा सिनेमा कोणताही 'शुगर कोटिंग' न करता अत्यंत प्रामाणिकपणाने तयार केलेला आहे. हा सिनेमा करण्याचा मार्ग अत्यंत खडतर होता. कोणताही स्टुडिओ, कंपनी आणि निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता.

 
समाजात काही वाईट प्रवृत्ती असतात. त्या वाईट प्रवृत्तींविषयी भाष्य करणारा हा सिनेमा आहे. कुठेही मुस्लिम धर्म आणि मुस्लिम नागरिकांविषयी वाईट मत तयार करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. त्या प्रवृत्तींना जगासमोर आणायला पाहिजे. त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
अडीचशे वर्षांपूर्वी बदलण्यात आलेल्या भारतीय शिक्षा पद्धतीमुळे भारतीयांची मानसिकता तयार झालेली आहे. ही शिक्षा पद्धती आणि मानसिकता बदलणे आवश्यक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि इस्लामी आतंकवादाविषयी देशात चर्चा सुरू झालेली आहे. लोक त्याला पसंती देत आहेत. आम्ही कधीही या सिनेमातून किती कमाई होईल याचा विचार केलेला नव्हता. सर्वसामान्य भारतीय जनतेने हा सिनेमा उचलून धरला आहे. आतापर्यंत तीन साडेतीन कोटी लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे. सत्य कायम कडवट असते. आपण कितीही डोळे झाकून बसलो तरी देखील सत्य बदलत नाही. त्यामुळे सत्य स्वीकारण्याची तयारी देखील केली पाहिजे. सिनेमा पाहण्याआधीच कसला विरोध करताय? (सुदीप्तो सेन, दिग्दर्शक, द केरला स्टोरी)
Powered By Sangraha 9.0