मुंबई : महाविकास आघाडीची येत्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी लवकरच मविआत सामील होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
वंचितला मविआत घेण्यासाठी ठाकरे गटाकडुन जोरदार हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीत येण्याची इच्छा वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आंबेडकरांना या बैठकीचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. आंबेडकर या बैठकीला आल्यास वंचितला किती जागा सोडायच्या आणि कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच वंचितची जागांची अपेक्षा काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.