मुंबईत यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार

20 May 2023 19:20:40
mumbai

मुंबई
: घरगुती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी मुंबई महानगरपालिकेकडून कायम ठेवण्यात आली असून शाडूच्या गणेशमूर्तींचा वापर जास्तीत जास्त व्हावा या उद्देशाने ही बंदी कायम ठेवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच या मुर्त्यांची उंची चार फुटांपर्यंतच असावी असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. परंतु यावर मुंबईतील मूर्तिकारांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

दरम्यान शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांना प्रत्येक प्रभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शाडूच्या मुर्त्या बनवणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक स्तरावर शाडूची माती देण्यात येणार असून राज्याच्या विविध भागातून शाडूमाती आणावी किंवा राज्याच्या बाहेरून खासकरून गुजरातहून ही माती मागवण्यात यावी असे निर्देशही आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

पालिकेचा निर्णय उत्तम

प्रथम पालिका किंवा ट्राफिक पोलिसांकडून परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असे. मात्र आता पालिकेकडून घेण्यात आलेला निर्णय खरंच उत्तम आहे. पालिका स्वतःच जर मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देणार असेल तर मूर्तिकारांसाठी खरतर सोयीस्कर असेल आणि मूर्तिकारांना एक उत्तम संधी मिळणार आहे.
- मूर्तिकार संजय वालिवडेकर, मनपसंद गणेश आर्ट, कांदिवली

लाल मातीबाबत प्रबोधन गरजेचे

पालिकेने शाडूच्या माती संदर्भात घेतलेला निर्णय स्तुत्य आहेच. परंतु पालिकेने शाडूच्या माती सोबत लाल मातीच्या मुर्त्यांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे. लाल माती पासून मुर्त्या बनविणारे मूर्तिकार फारसे प्रसिद्ध नाहीत. तर लाला मातीची मूर्ती घेतल्यास ती लगेच खंडेल अशी भीती लोकांना असते. मात्र हे खरे नाही. मूर्ती कशापासूनही बनवलेली असली आणि तिला योग्य पद्धतीने हटले नाही तर ती खंडित होण्याची भीती असतेच. त्यामुळे पालिकेने लाल मातीकडेही लक्ष पुरवणे अधिक गरजेचे आहे.
- मूर्तिकार मंगेश मोरे, सोपान ग्रीन गणेशा, मालाड

शाडू माती पीओपीला पर्याय नाही

शाडू माती हा कधीच पीओपी ला पर्याय असू शकत नाही. कागदी लगद्यापासून आम्ही मागील अनेक वर्षांपासून गणेश मूर्ती बनवीत आहोत. यासाठी विघटन होऊ शकणार कागद आणि डिंकाचा वापर करण्यात येतो. कागदी लगद्यापासून बनव्यात आलेल्या मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली असून त्याचे विसर्जन भाविक घरात सुद्धा करू शकतात. सुमारे १५ फुटांपर्यंत गणेशमूर्ती कागदी लागद्यपासून बनव्यात येते. पण कागदी लगद्यापासून बनवलेल्या मुर्त्या या पर्यावरण पूरक नसल्यचा बाऊ करण्यात येतो. मात्र असे काही नाही हा केवळ गैरसमज आहे. सरकारी यंत्रणेने याकडे लक्ष पुरविणे आणि योग्य ती मदत करणे गरजेचे आहे
- संदीप गजाकोश, प्रथमेश इको फ्रेंडली कार्यशाळा, कुर्ला

सरकारची केवळ चालढकल

सरकारने केवळ चालढकल केली आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वे २०२० आणि राष्ट्रीय लवादा संस्थेच्या निर्णयावर पाणी फेरण्यात आले आहे. पीओपीच्या मुर्त्या कायम स्वरूपी बंद करण्यात याव्या असा न्यायालयाचा देखील निर्णय आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही मूर्तिकार स्वागत करतो पण जे मूर्तिकार नाही केवळ विक्रेते आहेत ते या निर्णयाचा विरोध करत आहेत. दरम्यान पर्यावरण पूरक मुर्त्यांची मागणी वाढत असून त्याकडे सरकारी यंत्रणेने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. पालिकेने चार फुटांपर्यंतच्या मुर्त्यांची निर्णय तर घेतला मात्र मोठ्या मुर्त्यांकडे पालिका कानाडोळा करत आहे. यावर पालिकेने धोरणात्मक काम करणे गरजेचे आहे.
- वसंत राजे, अध्यक्ष, श्री गणेश मूर्तीकला समिती
Powered By Sangraha 9.0