संसदेची नवी वास्तू विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिक : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

20 May 2023 18:28:44
om birla

नवी दिल्ली
: भारतीय संसदेची नवी वास्तू विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिक ठरणार आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्विटद्वारे केले आहे. देशाच्या नव्या संसदेची उभारणी पूर्ण झाली असून येत्या २८ मे रोजी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी ट्विटद्वारे संसदेच्या नव्या वास्तूविषयी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, संसदेची नवनिर्मित इमारत भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करेल. या इमारतीमध्ये सन्माननीय सदस्य देश आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. देशाते पंतप्रधान २८ मे रोजी ही इमारत राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचप्रमाणे १४० कोटींहून अधिक देशवासीयांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करून, संसदेची नवनिर्मित इमारत २०४७ सालापर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी एक सशक्त माध्यम बनेल, असाही विश्वास बिर्ला यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


Powered By Sangraha 9.0