काँग्रेस पक्षाचा कर्नाटक विजय, रेवडी कल्चरला चालना देणारा

20 May 2023 10:04:28
Congress

सगळेच राजकीय पक्ष जनतेला लुभावण्यासाठी निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या घोषणा करत असतात. पण यावर्षीच्या कर्नाटक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने आपल्या घोषणापत्रात रेवडी कल्चरचा कळसच गाठला आहे. या घोषणांचा फायदाही निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेसला या निवडणुकीत अभूतपूर्व असे यश मिळाले.
 
कॉंग्रेस पक्षाने आपल्या घोषणापत्रात ५ गॅरेंटी दिल्या होत्या. या ५ गॅरेंटीमध्ये प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन, प्रत्येक डिप्लोमा झालेल्या बेरोजगार युवकाला १५०० रुपये बेरोजगार भत्ता तर पदवीधर युवकाला ३००० रुपये भत्ता देण्याचे आश्वासनही कॉंग्रेसने दिलेले आहे. सोबत १० किलो तांदूळ, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज आणि राज्य परिवहनच्या बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास. या सर्व गोष्टी जनतेला मोफत देण्यात तसं पाहिले तर कोणाचीही हरकत नसावी. पण या सर्व रेवडी वाटपाचा कार्यक्रम करताना कॉंग्रेस सरकारला कर्नाटकच्या आर्थिक स्थितीचे सुद्धा भान ठेवावे लागणार आहे. या सर्व मोफत वाटपाच्या कामांसाठी कर्नाटक सरकारला ६२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च कर्नाटकच्या एकूण बजेटच्या २०% एवढा आहे.
 
देशातील सर्वच राज्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाहीये. कर्नाटकवर ५ लाख ६० हजार कोटी एवढे प्रचंड कर्ज आहे. कर्नाटकच्या नुकत्याच स्थापन होणाऱ्या कॉंग्रेस सरकारने या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्याचे ठरवल्यास, कर्नाटकवर आणखी कर्जाचा बोजा वाढणार यांत शंका नाही.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोर शहराला सिलिकॉन व्हॅलीचा दर्जा प्राप्त आहे. पण या ओळखी व्यतिरिक्त बंगलोरची ओळख आता ट्राफिक कॅपिटल म्हणून होत आहे. ही नकोशी ओळख मिटवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागणार आहे. त्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे.त्यानंतर आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची गरज पडणार आहे. आता सरकार स्थापन झाल्यानंतर कॉंग्रेसला कर्नाटक राज्याची आर्थिक बाजू सांभाळताना तारेवरीची कसरत करावी लागणार आहे. सोबतच लोकांच्या अपेक्षा पण पूर्ण कराव्या लागणार आहे. जर कॉंग्रेस पक्षाला लोकांच्या या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही, तर याचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला बसू शकतो.

 
- श्रेयश खरात


Powered By Sangraha 9.0