बारावीचा निकाल ३१ मे ला जाहीर होणार?

20 May 2023 18:27:55

12th result
 
 
मुंबई : बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावी परीक्षेवेळीच शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे तब्बल 20 दिवस पेपर तपासणी रखडली होती.याचा फटका निकालाच्या कामाला बसला असून बारावी निकालाची निश्चित तारीख अद्याप ठरली नसल्याचेही गोसावी म्हणाले.
 
21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. या परीक्षेला राज्यातील एकूण 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सुरू होताचा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. या बहिष्कार आंदोलनात 20 दिवस पेपर तपासणी होऊ शकली नाही. त्यामुळे पेपर तपासणी पूर्ण होऊन निकाल तयार करण्यास वेळ लागत आहे.
 
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच जूनच्या पहिल्याच आठवडय़ात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही शरद गोसावी यांनी दिली. यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावी-बारावी निकालाच्या तारखा निश्चित करण्यापूर्वी राज्य शिक्षण मंडळात सर्व विभागीय शिक्षण मंडळाची गोपनीय बैठक पार पडते. या बैठकीत विभागीय निकालाच्या कामाचा आढावा घेऊन त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची तारीख ठरविण्यात येते, मात्र अद्याप राज्य शिक्षण मंडळात अशी गोपनीय बैठकही पार पडलेलीनाही.
 
 
राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट बंद
 
राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट बंद आहे. ऑनलाईन निकालाच्या पार्श्वभूमीवर वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थी, पालकांना निकालाशी संबंधित माहिती मिळत नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईट कार्यान्वित नसून ती लवकर सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, असेही गोसावी यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0