नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रथमच होणार 'वाघांचे ट्रान्सलोकेशन'

19 May 2023 10:26:26




tigress



मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पहिल्यांदाच वाघांचे स्थानांतरण (ट्रान्सलोकेशन) करण्यात येणार आहे. शनिवार दि. २० मे रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २ मादी वाघिणींचे चंद्रपुरातील ब्रह्मपुरी येथून नागझिरा क्षेत्रात स्थानांतर केले जाईल.


नवेगाव नागझिरा हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात असलेला देशातील ४६वा व राज्यातील ५ वा व्याघ्र प्रकल्प आहे. ६५६.३६ चौ. किमी गाभा क्षेत्र आणि १२४१.२४ चौ. किमी बफर क्षेत्र असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात २० प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे. ऑल इंडिया टायगर एस्टीमेशनच्या २०२२ च्या अहवालानुसार नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात ११ वाघांचे वास्तव्य आहे. व्याघ्र क्षेत्र हा कमी घनतेचा व्याघ्र भूभाग असल्याने चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी भूभागातून कॉन्सरवशन ट्रान्सलोकेशन ऑफ टायगर्स या प्रकल्पांतर्गत ४-५ मादी वाघिणींचे स्थानांतर केले जाणार असून यापैकी २ वाघिणींचे पहिल्या टप्प्यात स्थानांतर केले जाईल. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि. २० मे सकाळी या व्याघ्र जोडीला वन क्षेत्रात सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ४-५ वाघिनींना आणणे प्रस्तावित असून इतर वाघ टप्प्या टप्प्याने नागझिरामध्ये आणले जाणार आहेत.



Sudhir Mungantiwar


नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभ्यामध्ये या दोन वाघिनींना सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून सोडण्यात येणार आहे. सॅटेलाईट जीपीएस कॉलर आणि व्हीएचएफच्या साहाय्याने या वाघांवर सक्रिय नियंत्रण ठेऊन नजर ठेवण्यात येणार आहे. ब्रम्हपुरी भूभागातील वाघ आणल्यामुळे चंद्रपूरमध्ये होत असलेल्या मानव-व्याघ्र संघर्षावर ही आळा बसण्यास मदत होईल. तसेच या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील वाघांची संख्या वाढून पर्यटनाला ही चालना मिळू शकते, व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.



Powered By Sangraha 9.0