विजयाचा छत्रपती शिवराय पॅटर्न!

19 May 2023 22:09:11
devendra1

“महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ चालणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, ‘भाजप पॅटर्न’, ‘मोदी पॅटर्न’, ‘छत्रपती शिवराय पॅटर्न”’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमधील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबविण्याची स्वप्ने पाहणार्‍या महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेना ही भाजपबरोबर निवडून आली होती. पंतप्रधान मोदी यांचे मोठाले छायाचित्र लावून निवडून आली होती. उद्धव ठाकरे यांचा ‘स्टॅम्पसाईज’ तर पंतप्रधानांचे मोठे छायाचित्र लावून निवडून आली होती. ती काय उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राच्या जोरावर निवडून आलेली नव्हती. तरीही आपल्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर ते गेल्यानंतर शिवसेनेत जे खरे बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक होते, त्यांच्या विचारांवर चालणारे होते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाहेर पडले. ते आपल्याबरोबर आले. ज्यांना २०१९ मध्ये जनतेने निवडून दिले होते, तीच शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने केवळ वसुली केली. ती किती केली, हे माहितीच आहे. वाझेची कथा सांगायची गरज नाही. यांच्या वसुलीची वेगवेगळी माध्यमे आहेत. पण, यांनी महाराष्ट्राचा सूड उगवण्याचे काम केले. आपले सरकार स्थापन झाले आहे. पण, राजाचा जीव पोपटात आहे.

पण दुसरा पोपट ‘बीएमसी’ आहे. २५ वर्षे हे कुरण खाऊन हे मोठे झालेत. मुंबईची तिजोरी लुटून मोठे झाले आहेत. अडीच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. अडीच वर्षांत देशभरात मेट्रोची कामे होत होती. आमची मेट्रोची कामे बंद होती. रस्त्याची कामे बंद होत होती. विकास बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती. एकच कारण होते. ही सगळी कामे पूर्ण झाली, तर भाजपला त्याचे श्रेय मिळेल. आपण काम करत असताना यांचा आरोप होतो आहे की, तुम्ही मुंबईचे पैसे संपवत आहात. पैसे काय चाटण्यासाठी ठेवलेत का? आणि एवढी कामे करून पालिकेच्या तिजोरीत दहा हजार कोटींची वाढच झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायचीच आहे. ती मुंबईच्या जनतेच्या हातात द्यायची आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा आपण जिंकू,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबईच्या दोन दिवसीय दौर्‍यावर आले होते. यादरम्यान त्यांनी काही बैठकाही घेतल्या. यावेळी फडणवीस बोलत होते.

महाविकास आघाडीविरोधात टोलेबाजी करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमेतवर, भ्रष्टाचारावर तसेच कुख्यात दाऊदशी असलेल्या संबंधांवर बोट ठेवले. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जो उल्लेख करण्यात आलेला आहे, तो फडणवीस यांनी अधोरेखित केला. महाविकास आघाडीने ‘वज्रमूठ’ म्हणून जो प्रयोग केला, त्यावरही सडकून टीका केली. शरद पवार हेच या वज्रमुठीचे प्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे हे चेहरा असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. “आम्ही जेव्हा उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत म्हणत होतो, तेव्हा आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले गेले. चंद्रकांतदादा पाटील यांनाही असेच म्हटले गेले. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहर्‍याबद्दल जी वाक्ये लिहून ठेवली आहेत, त्याबद्दल मी शरद पवारांचे कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाही. ‘टीआरपी’ कसा घायचा, याचे प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करे. मग मीच राजीनामा मागे घेऊन आणि माझ्या जागी परत येईन. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की, राजीनामा देतो म्हणणे आणि राजीनामा देणे यातला फरक काय आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी पुणे येथे प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलताना महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर आघाडीतील राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरे गटाला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात ‘कर्नाटक फॉर्म्युला’ कसा राबवता येईल, याचाही विचार करण्यात येत आहे. त्याचाही समाचार फडणवीस यांनी घेतला आहे. “जे म्हणतायत कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना सांगेन हा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवराय यांनी एकेक मावळा तयार केला आहे. त्याला देव-देश-धर्मासाठी कसे लढायचे हे माहिती आहे. महाराष्ट्रात कोणताच ‘कर्नाटक पॅटर्न’ चालणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, भाजप पॅटर्न, मोदी पॅटर्न, छत्रपती शिवराय पॅटर्न. २०१८ मध्येही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ निवडणुकांनंतर विरोधी पक्षाकडून भाजप संपल्याचे सांगितले जात होते. मात्र, सहाच महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या तीनही राज्यांमधील लोकसभेच्या सगळ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळीही तसेच होणार आहे. महाराष्ट्रात भाजपने २०१४ साली ४२ जागा जिंकल्या, २०१९ सालीही तेवढ्याच जागा जिंकल्या आणि आता २०२४ मधील निवडणुकीतही भाजप तेवढ्याच जागा जिंकेल, एखादी जास्तीच जिंकेल,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी उल्लेख केलेली एखादी जास्तीची जागा ही बारामतीची तर नाही ना, याचीच उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे.
Powered By Sangraha 9.0