संघर्षाची जाणीव ठेवा

    19-May-2023
Total Views |
bjp

भाजप प्रत्येक निवडणुकीत नवीन गोष्टी शिकत पुढे जात असते असे म्हणतात. भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकामध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा नव्याने रणनीती आखून झालेल्या चुका सुधारण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच प्रत्यय भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिला. अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण आरामात निवडून येऊ, अशी काहीशी भावना काही लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सप्तसुत्रावर काम करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी भारतीय जनता पक्ष हा संघर्षातून आणि एका विचारधारेतून उभा राहिलेला पक्ष असल्याची जाणीव करून दिली. भारतीय जनता पक्षाचं आजचं यश सर्वांना दिसत असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या यशासाठी आतापर्यंत चार पिढ्या खपल्या असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. विपरित काळामध्ये पक्षाचं काम अनेकांनी केलं. आपलं घरदार सोडून, संघर्ष करून पक्ष इथपर्यंत आणला आहे. त्यांच्या त्यागामुळे सर्वजण यशात भागीदार होत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. मागच्या चार पिढ्यांनी अंधार सोसला म्हणून आजचा उजेड आपण अनुभवत आहोत. जर त्या अंधारातील संघर्षाची जाणीवच आपल्याला राहिली नाही, तर त्या प्रकाशाचे मूल्यदेखील राहणार नाही, असे देखील त्यांनी नमूद केले होते. नड्डा यांचे हे वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना संघटन वाढविण्याचे आवाहन केले. संघटनात्मक काम हेच मूळ काम असते. संघटनेचे अधिष्ठान विचारात आणि तत्वज्ञानात असते. आपल्याला शेवटचा माणूस जोडायचा आहे या संघाच्या विचाराधारेला अनुसरूनच नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. ‘क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे’ या उक्तीप्रमाणे नुसतीच बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर अधिक भर देण्याचा संदेश दिला. कार्यकर्ता म्हणून आपले योगदान काय आहे? याचे आत्मचिंतन त्यांनी करायला लावले आहे. त्यांच्या भाषणातील राजकीय संदर्भाने आलेले वक्तव्य बाजूला काढले, तर कार्यकर्ता घडविणे आणि संघटन वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे त्यांचे वक्तव्य होते.

विनाकारण हॉर्न... मानसिक आजार

गाडीचे हॉर्न विनाकारण सतत वाजवीत राहणे, हे नव्या मानसिक आजाराचे लक्षण ठरू पाहत आहे. सिग्नल असो की मोकळा रस्ता असो... छोटी गल्ली बोळ असो महामार्ग असो वाहनचालक हॉर्न वाजवत जाताना दिसतात. काही प्रसंगी तर विनाकारण हॉर्न वाजवत जाणारी माणसं दृष्टीस पाडतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या काळात हा नव्याने जडू पाहत असलेला एक आजार आहे. जो आपल्या नकळत आपल्याला जडतो. मानसिक अस्वस्थ्याचे ते लक्षण आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय या ठिकाणी ’नो हॉर्न झोन’ घोषित केलेले असतात. परंतु, अनेकदा वाहनचालक त्या ठिकाणाहून मुद्दाम फोन वाजवीत जाताना दिसतात. आवश्यकता असेल तेव्हाच तो वाजवला जावा असा साधारण संकेत आहे. नागरिकांना विनाकारण आणि कर्णकर्कश आवाजातील हॉर्न वाजविण्यापासून परावृत्त करणे, ही काळाची गरज बनली आहे. सतत हॉर्न वाजवीत राहिल्यामुळे मानसिक दडपण येणे, चिडचिड होणे आणि अस्वस्थता येणे अशा प्रकारची लक्षणे सुरू होतात. आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते ते वेगळेच. त्यामुळे वाहन कंपन्यांनीदेखील आता एका विशिष्ट आवाजाच्या मर्यादेच्या पलीकडे वाजणार नाहीत, अशा हॉर्नची निर्मिती करणे आवश्यक बनले आहे. त्याकरिता शासकीय स्तरावर पॉलिसीदेखील निर्माण करावी लागेल. हॉर्नविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून जाणार्‍या गरोदर स्त्रिया, लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना त्रास होतो. जोरात हॉर्न वाजवल्यामुळे अनेकांना घाबरल्यासारखे देखील होते. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. पोलिसांकडून विनाकारण हॉर्नसंदर्भात कारवाईदेखील केल्या जातात. परंतु, त्या अन्य कारवाईच्या तुलनेत अत्यंत तुरळक असतात. पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी सहभाग, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन हॉर्नविषयक जनजागृती व प्रबोधन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याकरिता धोरण निश्चित करणेदेखील आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात ही समस्या अधिक उग्र रूप धारण करेल. सतत हॉर्न वाजविण्याची सवय मानसिक आजारात परावर्तित होण्यापूर्वीच बदलली जाणे गरजेचे आहे.

लक्ष्मण मोरे 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.