आदिपुरुष चित्रपटावर शरद केळकरची प्रतिक्रिया

19 May 2023 16:51:17
 
मुंबई : अभिनेता शरद केळकरचा आवाज उत्तम आहे. त्याने यापूर्वी अनेक पात्रांना, भूमिकेसाठी आपला आवाज दिला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या हिंदी भाषांतरासाठी मराठी अभिनेता शरद याने आपला आवाज दिला आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत असलेलं त्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे. आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित झाल्यानंतर सर्वानी टीकात्मक टिप्पणी केली होती. परंतु ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर सर्वाना चित्रपटाविषयी आत्मीयता वाटू लागली आहे. तसेच सकारात्मक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. याच धर्तीवर शारदची प्रतिक्रिया महत्वाची आहे.
 

shard kelar  
 
सिद्धार्थ कान्ननला दिलेल्या मुलाखतीत शरद म्हणाला, “मी या चित्रपटाचा फायनल कट अजून पाहिलेला नाही. पण मी हा चित्रपट जितका पाहिला आहे तितका मला खूप आवडला. डबिंगबद्दलही कोणालाही काहीही तक्रार नाही. या चित्रपटाबद्दल मला फार माहिती नाही पण चित्रपटाची कथा, त्याची मांडणी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया ही उत्कृष्ट आहे. या चित्रपटाच्या डबिंगनंतर प्रभासने मला मिठी मारली आणि माझ्या कामाचं त्याने कौतुक केलं, ही मला मिळालेली सगळ्यात मोठी पावती आहे, असं मी समजतो.”
 
शरद केळकरने याआधी प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेच्या हिंदी व्हर्जनसाठी डबिंग केलं होतं. तर ‘बाहुबली’ नंतर पुन्हा एकदा प्रभासच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना शरद केळकरचा आवाज ऐकू येणार आहे. शरद केळकर ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनसाठी डबिंग करणार हे कळल्यावर प्रेक्षक खूप उत्सुक होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याचा आवाज ऐकून सर्व जण त्याचं भरभरून कौतुक करत आहे. या चित्रपटासाठी डबिंग करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे आता त्याने शेअर केलं आहे.
 
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात श्रीरामांची भूमिका प्रभास साकारत आहे, सीतेची भूमिका क्रिती सेनॉन साकारत आहे, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे, तर मराठमोळा देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.
अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास श्री रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला श्री रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला मराठमोळ्या शरद केळकरने आवाज दिला आहे.
Powered By Sangraha 9.0