ज्ञानवापी शिवलिंगाचे शास्त्रीय सर्वेक्षण तूर्तास नाही : सर्वोच्च न्यायालय

19 May 2023 18:58:25
gyanvapi

नवी दिल्ली
: ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी, तपासण्यासाठी शास्त्रीय चाचणीस परवानगी देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्तास स्थगित केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निर्देशांचे परिणाम बारकाईने तपासण्याची गरज आहे, त्यामुळे परिणामांचा विचार होईपर्यंत शास्त्रीय चाचणीस स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शिवलिंगास इजा न पोहोचविता कार्बन डेटींगसह अन्य शास्त्रीय तंत्राने चाचणी करण्याविषयीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अहवालाचेही अध्ययन करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. कार्बन डेटींगविषयी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश राज्य सरकार आणि हिंदू पक्षास न्यायालयाने त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत शास्त्रीय होणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

ज्ञानवापी संकुलातील कथित मशिदीच्या वजुखान्यात सापडलेल्या शिवलिंगाची वैज्ञानिक चाचणी करण्यात यावी, ही हिंदू पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य करून तसे निर्देश दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली.



Powered By Sangraha 9.0