शंभर तासात १०० मार्गिका किमी अंतराचे डांबरीकरण

19 May 2023 17:08:47
highway

नवी दिल्ली
: गाझियाबाद – अलिगढ द्रुतगती महामार्गावर विक्रमी १०० तासांमध्ये १०० मार्गिका किमी अंतरावर बिटुमिनस काँक्रीटीकरण (डांबरीकरण) पूर्ण करण्यात आले आहे. याद्वारे ङारताच्या पायाभूत सुविधा उद्योगाची गती आणि प्रगती अधोरेखित झाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३४ चा गाझियाबाद – अलिगढ हा ११८ किमीचा भाग असून तो या दोन्ही शहरांमधील दाट लोकवस्तीच्या प्रदेशांमधील वाहतूक दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. हा प्रकल्प दादरी, गौतम बुद्ध नगर, सिकंदराबाद, बुलंदशहर आणि खुर्जासह उत्तर प्रदेशातील विविध शहरांमधून जातो. हा एक महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग म्हणून काम आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील मालवाहतूक सुलभ करणे, औद्योगिक क्षेत्रे, कृषी क्षेत्रे आणि शैक्षणिक संस्थांना जोडून प्रादेशिक आर्थिक विकासात योगदान देणारा ठरणार आहे.

या महामार्गाची बांधणी क्यूब हायवेज, एल अँड टी आणि गाझियाबाद – अलिगढ एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात येत आहे. महामार्ग बांधणीसाठी कोल्ड सेंट्रल प्लांट रिसायकलिंग (सीसीपीआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे कच्च्या सामग्रीचा वापर १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे इंधनाचा वापर आणि हरितगृह वायू उत्सर्जनासह कार्बन उत्सर्जनातही घट झाली आहे.

नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली वेगवान महामार्गांची उभारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी वाहतूकीसह वाणिज्य व आर्थिक घडामोडींना दर्जेदार महामार्गांच्या जाळ्याद्वारे गती देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामध्ये गुणवत्तेस तडजोड न करता जलद गतीने जागतिक दर्जाचे महामार्ग विकसित केले जात आहेत. केंद्रीय रस्ते बांधणी व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारतात चौफेर दर्जेदार महामार्गांची बांधणी केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0