पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शक्तिशाली परदेश दौरा

तीन देश, सहा दिवस, ४० कार्यक्रम आणि २४ जागतिक नेत्यांसोबत चर्चा

    19-May-2023
Total Views |
pm modi

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७, क्वाडसह अन्य बहुपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे शिखर परिषदेत द्विपक्षीय बैठकांसह अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

जपान येथे जी ७ देशांच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरुन मी जपानच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी ७ देशांच्या बैठकासाठी जपान येथे जात आहे. जगासमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि त्यांच्यावर सामूहिकपणे मात करण्याची गरज यासंदर्भात जी ७ सदस्य राष्ट्रे तसेच इतर निमंत्रितांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास भारत उत्सुक आहे. यावेळी द्विपक्षीय बैठका घेणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमंतर पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर जाणार असून येथे जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. येथे आयोजित हिंद-प्रशांत द्वीप सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेचे (एफआयपीआयसी ३) यजमानपद पंतप्रधान मोदी आणि पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे संयुक्तपणे भूषविणार आहेत. यामध्ये हवामान बदल आणि शाश्वत विकास, क्षमता बांधणी तसेच प्रशिक्षण, आरोग्य आणि स्वास्थ्य, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनी शहरास भेट देणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या अनेक उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तसेच व्यापार प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सिडनी येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाशी संवादही साधणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.