मुंबई महानगरपालिका निवडणुका ऑगस्टनंतर?

प्रभाग संख्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

    19-May-2023
Total Views |
bmc

मुंबई
: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय-प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच, सर्वोच्चन्यायालयातील पालिकेच्या प्रभाग संख्येचे प्रकरण आता ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता आता वर्तविण्यात आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेची मुदत संपली आणि प्रशासकीय राजवट लागू झाली. परंतु, मुंबईतील प्रभाग संख्या मविआ सरकारने २२७ वरून २३६ इतकी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही प्रभागसंख्येतील वाढ लोकसंख्येच्या आधारावर असल्याचे तत्कालीन सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, फडणवीस-शिंदे सरकारने ही संख्या पुन्हा एकदा २२७ इतकी केली असून, मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस - शिंदे सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

जनगणनेनुसार, प्रभाग रचना ही निर्धारित केली जाते. या नियमाप्रमाणे २००१च्या जनगणनेनुसार २२७ इतकी मुंबईची प्रभाग संख्या ठरवण्यात आली होती. मात्र, २०११च्या जनगणनेनुसार मुंबईतील प्रभागसंख्या २३६ इतकी वाढविल्याचा दावा मविआकडून करण्यात आला होता. मविआ सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तुषार मेहता यांनी प्रतिवाद केला आणि दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावत, हे प्रकरण आता थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वर्ग केले आहे. पालिकेच्या प्रभागसंख्येबाबत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण हे थेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लांबणीवर पडल्यामुळे या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत तरी पालिकेच्या निवडणुका होणार नाहीत, हे मात्र नक्की झाले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.