गौरव बान्गियाने रंगवलेली ‘फिर वही शाम’

    19-May-2023
Total Views |
gaurav

‘फिर वही शाम’, ‘तेरी आँख के आँसू पी जाऊँ ये हवा’, ‘ये हवा, ये रात, ये चाँदनी’, ‘तस्विर बनाता हूँ’, ‘जलते हैं जिसके लिये’ अशी किती-किती नि कितीतरी काळजाला हात घालणारी गाणी! सहा-सात दशकांनंतरदेखील त्या गाण्यांची आठवण जेव्हा जेव्हा येते, तेव्हा त्या गात्या गळ्याचा मखमलीपणा श्रोत्यांच्या कानांनाच काय, तर अंत:करणांनाही आजसुद्धा स्पर्शून जातो आणि तलतदा कसे अजरामर आहेत, याची साक्ष पटवतो. तलत मेहमूद या अजोड गायकाच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त, आजच्या पिढीतील गौरव बान्गिया या तरुण गायकाने त्यांना दिलेल्या सुरेल स्वरवंदनेच्या निमित्ताने...

बघता-बघता, चक्क २५ वर्षे उलटली. आपल्यासारख्या अगणित देशविदेशातील रसिकांना नादावून गेलेल्या, तलत मेहमूद या गंधर्व गायकाला शरीराने या इहलोकांतून गेल्याला! अन् तरीही तलतदा त्यांच्या चाहत्यांच्या काळजात कसे रुतून बसले आहेत, याचा प्रत्यय रविवार, दि. ७ मे रोजी, विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर झालेल्या ‘फिर वही शाम’ या तलत-स्मृती-संगीत-रजनीत आला. गेली दोन-तीन दशके विलेपार्ल्याच्या सांस्कृतिक जीवनात भरीव कामगिरी बजावत असलेल्या ‘स्वरगंधार’ व ‘जीवनगाणी’ या दोन संस्थांनी मिळून ही स्मृतिसंध्या आयोजित केली होती.

‘तलत मेहमूद’ सादर करण्याचे इंद्रधनुष्य पेलण्याचे आव्हान आपल्या भावुक गळ्याच्या बळावर स्वीकारलेल्या तरुण गायक गौरव बान्गिया खरं तर मूळ दिल्लीतला! वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासूनच त्याच्या सार्वजनिक गायनाला प्रारंभ झाला. ‘सखा’नावाच्या एका संघटनेसाठी त्याने गायलेल्या ज्या गाण्याचे कौतुक उपस्थित सर्व श्रोत्यांनी भरघोस दाद देऊन तर केलेच; पण त्या छोट्या गायकातील असाधारण मोठी गुणवता संयोजक अमरजितसिंग कोहली यांनी हेरली आणि दिल्लीच्या प्रतिष्ठित सिरी फोर्ट प्रेक्षागारात गाण्याची संधी त्या मुलाला त्यांनी दिली. त्याही कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिलीच. पण, तिथे खास पाहुणा म्हणून आलेले ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांच्या नजरेतही हा होतकरी गायक भरला. अनिलदांनी तत्क्षणी कोवळ्या गौरवला मन:पूर्वक आशीर्वाद नि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

भावी वाटचाल सुस्पष्ट

तेव्हाच गौरवच्या मनात त्याची भावी वाटचाल सुस्पष्ट झाली. मानवस्थळी तसेच नवयुग शाळांतून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, नंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माळ महाविद्यालयातून पदवी-शिक्षण घेऊन होताच, संगीताच्या अनावर ओढीने गौरव थेट मुंबईला पोहोचला. नामवंत संगीतकार-व्हायोलिनवादक मोहिंदरासिंग, नंतर श्रीकांत वैद्यनाथन, पं. राजा काळे, पं. भवदीप जयपूरवाले यांच्याकडेही त्याने संगीताचे धडे गिरवले. त्या प्रशिक्षणातूनच गौरवला ‘झी-टीव्ही’च्या ‘सारेगमप’ गानस्पर्धेत उतरण्याचा आत्मविश्वास लाभला आणि २००२ साली तो त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता निवडला गेला. त्यानंतर सलग दहा वर्षे तो त्या कार्यक्रमात विजेताच ठरत आला. त्यातूनच मनोहर अय्यरच्या ‘कीप अलाईव्ह’च्या लोकप्रिय सांगीतिक कार्यक्रमांत गाऊन आपला ठसा उमटविण्याची संधीही त्याला लाभली.हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, गुजराती अशा अनेक भाषांतील चित्रपटांसाठी पार्श्वगायन आतापर्यंत त्याने केले आहे. मोठमोठ्या उत्पादनांच्या जाहिराती नि जिंगल्सही त्याने रेकॉर्ड केले आहेत. गेली ३० वर्षे देशविदेशात आपल्या गायनाचे जाहीर कार्यक्रम तो सादर करत आला आहे आणि आत तर तो स्वत:च संगीतकारही बनला आहे.

सभागृहच तलतमय!

केवळ संगीत-आराधनेलाच स्वत:ला वाहून घेतल्यामुळे चाळीशी पार केली तरी, अविवाहितच राहिलेला गौरव अजूनही कोवळा तरुणच दिसतो! त्यामुळे त्याला तलत कसा झेपेल, अशी धाकधुकच उपस्थितांच्या मनात होती. पण, ‘मैं दिल हूँ इक अरमानभरा’ (अनहोनी-१९५२ सं. रोशन) या पहिल्याच गाण्याचा सूर गौरवने असा लावला की, संपूर्ण सभागृहच ‘तलतमय’ झाले!
त्यानंतर ‘ऐ मेरे दिल कहीं और चल’ (दाग - १९५२) आणि मग ‘पतिता’तील (१९५३ - संगीत शंकर-जयकिशन) ‘अँधे जहाँ के अँधे रास्ते’ व ‘हैं सबसे मुधर वो गीत, जिन्हें हम अपने सूरमें गाते हैं’ ही दोन रसिकप्रिय गाणी गौरव सादर करू लागला. तेव्हा तर, संपूर्ण प्रेक्षागारातील अवघे तलतवेडे त्याच्या बरोबरीनेच ती गाणी गुणगुणू लागले. आपल्यासमोर बसलेले श्रोते किती ‘पोचलेले’ आहेत, याची चुणूक दिसताच, मग तर गौरवने, नंतरच्या कैक गाण्यांना सुरुवात करण्याचे खुले आवाहन श्रोत्यांना करून, त्यांची मनं जिंकली. तत्क्षणी तो कार्यक्रम केवळ सादरकर्त्या गौरवचा न राहता, उपस्थित समस्त तलतप्रेमींचाच होऊन गेला...

सभागृह हाऊसफुल्ल...

तशात तलतदांचे भक्त आनंद पेजावर यांनी, या तलत-स्मृति-वंदनेचे प्रायोजकत्व स्वीकारले असल्याने, ‘स्वर-गंधार’च्या विद्याधर निमकारांनी हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत प्रवेशाचा ठेवला होता. त्यामुळे प्रेक्षागृह ‘हाऊसफुल्ल’ होतेच; पण सर्वच रसिक असली तलतभक्त असल्याने, कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला! तलतदांच्या खासगी अल्बममधील, फैयाजलिखित, कमल दासगुप्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘तस्विर तेरी दिल मेरा बहला न सकेगी’, ‘पतिता’ (१९५१ संगीत - अनिल विश्वास)मधील ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’, ‘छाया’ (१९६१ सं. सलिल चौधरी-शायर राजेंद्र कृष्ण)मधील ‘आँखों में मस्ती शराब की’, ‘मदहोश’ (१९५१ सं. मदन मोहन, शायर-राजा मेहंदी अली खान) मधील ‘मेरी याद में तुम ना आँसू बहाना’, दिलें ए नादाँ’ (१९५३ सं. गुलाम मोहम्मद-शायर शकिल बदायुनी) मधील ‘जिंदगी देने वाले सुन’, ‘मिर्झा गालिब’ (१९५४ सं. गुलाम मोहम्मद - शायर मिर्झा गालिब)मधील ‘दिलें नादाँ तुझे हुआ क्या हैं’, ‘देवदास‘ (१९५५ सं. सचिनदा बर्मन-साहिर लुधियानवी) मधील आर्त ‘मितवा’ आळवणीनंतर मग सूरमयी रात ढलती जाती हैं’, ‘अब तेरा इन्तजार कौन करे’, ‘तेरी जुल्फों से प्यार करता हूँ’, ‘हमसे आया न गया’, ‘आँसू समझ के यूँ मुझे आँख से तुने गिरा दिया’, ‘शाम ए गम की कसम’, ‘मेरा प्यार मुझे लौटा दो’, ‘अश्कों में जो पाया हैं’, ‘जलते हैं जिसके लिये’, ‘फिर बोहि शाम’, ‘तस्विर बनाता हूँ’, ‘तेरी आँख के आँसू पी जाऊं’, ‘ये हवा, ये रात, ये चाँदनी’- एका मागोमाग एक तलतदांची सर्वाधिक श्रोतृप्रिय गाणी गौरव गातच राहिला आणि त्यातल्या प्रत्येक सुरावर श्रोते झुलत राहिले...

सोनालीची सुरेल साथ

साडेतीन तास रंगलेल्या या संगीत मैफिलीत सूरभिन्नता साधण्यासाठी गौरवला विद्याधरची पत्नी ख्यातनाम गायिका सोनाली कर्णिक हिने चार-पाच युुगुलगीते गाऊन सुरेल साथ दिली. ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’, ‘जायें तो जायें कहाँ’, ‘दिलमें समा गये सजन’, ‘मिलते ही आँखे दिले हुआ दिवाना किसी का’, ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा, के मैं इक बादल आवारा’ आदी तलतदांना मूळ गाण्यात साथ दिलेल्या लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त आदी गायिकांच्या स्मृती जागवत, सोनालीने गौरवला खरोखरच सोन्यासारखी साथ दिली. संगीत नियोजक प्रशांत लळीत यांच्या नेतृत्वाखाली, संगीतकुशल वादकांमुळे या गायकांचे गाणे खुलवले...

अंबरीश मिश्रांचे सूत्रसंचालन

गायक-वादक उत्तम असले तरी, अशा मोठ्या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी, त्याचे उत्तम सूत्रसंचालन करणार्‍या अनुभवी निवेदकाची गरज असतेच. ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक अंबरीश मिश्रा यांनी फर्ड्या हिंदीतून निवेदन करून, ती जबाबदारी उत्तम सांभाळली. ‘तलतदांना ऐकताना नेहमी वाटत राहतं की, हा आगळवेगळा गायक मूळ गीतकाराचे शब्द, संगीतकाराचे संगीत या पलीकडे जाऊन, स्वत:च्या मनातील गूजगोष्टीच आपल्याला सांगत आहे. त्यांच्या मखमली गळ्यामुळे तत्कालीन ख्यातनाम शायरांनी शब्दबद्ध केलेले मानवी दुःखही कसे सुंदर होऊन जात असे,’ म्हणत, अंबरीशने तलतदांच्या संगीत क्षेत्रातील वाटचालीचा धावता परिचय करून दिला.

लखनौच्या एका कर्मठ जमीनदार कुटुंबात १९२४ साली जन्मलेल्या तलतदांचा संगीतशौक त्यांच्या वडिलांना अजिबात पसंत नव्हता. पण, त्या विरोधाला न जुमानता तलतदांनी शास्त्रीय संगीताचा रियाज सुरूच ठेवला. लवकरच ते लखनौ आकाशवाणीवरून गीत गझला गाऊ लागले. त्या ऐकून त्यांच्या १६व्या वर्षीच ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ने दिल्लीला खास बोलावून घेतले आणि त्यांच्या गाण्यांची पहिली रेकॉर्ड काढली. ‘तस्वीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी...’ संगीतकार होते शास्त्रीय संगीतातील ‘डॉक्टरेट’ मिळवलेले कमलदास गुप्ता. त्यांनीच तरुण तलतला योग्य ते प्राथमिक संगीत शिक्षण दिले. ख्यातनाम संगीतकार अनिल विश्वास हे तलत मेहमूद यांचे दुसरे गुरू. तलतदांचे कोलकात्यात खूप नाव झालेले बघून अनिल विश्वास यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले आणि ‘आरजू’ चित्रपटासाठी त्यांच्याकडून आपले पहिले गाणे गाऊन घेतले. ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो’ (गीतकार - मजरूह सुलतानपुरी) अनिल विश्वासांकडे तलतसाहेबांनी केवळ वीसच गाणी गायली, पण ती सारीच गाजली. त्यामुळे तलतना चित्रगीतगायक म्हणून अनिलदांनीच घडवले, यावर दुमत नाही...

दिलीप कुमारचा आवाज

‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल’ हे गीत रूपेरी पडद्यावर अभिनेता दिलीपकुमार यांच्यावर चित्रीत झाले होते. ते गाणे तुफान लोकप्रिय झाले. त्यामुळे दिलीप कुमारांच्या पार्श्वगायक म्हणून तलतदांची सर्वदूर ओळख झाली. त्यामुळे अनिल विश्वासनंतर सज्जाद, सी. रामचंद्र शंकर- जयकिशन, नौशाद, मदन मोहन, सलील चौधरी, सचिनदा बर्मन, एन. दत्ता, मास्टर गुलाब मोहम्मद अशा थोर थोर संगीतकारांकडे गायची संधी तलतदांना मिळाली. मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, कैफी आझमी, शैलेंद्र यांसारखे अनेक गुणी शायर तलतसाहेबांनीच आपल्या श्रेष्ठ काव्यरचना गाव्यात, म्हणून त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवायचे.

अत्यंत देखणे व्यक्तिमत्त्व असलेल्या तलतदांनी मित्रांच्या आग्रहावरून दोन चित्रपटांत अभिनय केला होता. पण, ती आपल्या आयुष्यातील घोडचूक होती, असे मान्य करून नंतर त्या वाटेला ते पुन्हा कधीच गेले नाहीत. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘जहाँआरा’ हा एका अर्थी तलतसाहेबांच्या अखेरचा गाजलेला चित्रपट लोकांची बदलती, काही प्रमाणात बिघडलेली अभिरूची चित्रपटांत आलेली नायकांची नवी पिढी, काही प्रिय संगीतकारांचे निधन, तर काहींचा चित्रपट संन्यास आदी कारणांमुळे १९६४ नंतर तलतदांनी चित्रपटांसाठी गाणे सोडूनच दिले. पण, लोकप्रियतेमुळे जाहीर गायन कार्यक्रमांसाठी त्यांचे विदेश दौरे वरचेवर सुरूच असायचे. उशिराने का होईना, पण १९६६ साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ सन्मान देऊन तलतदांचा गौरव केला होता. दि. ९ मे, १९९८ रोजी तलतदांचे निधन झाले.

पण, तलतदांसारखे थोर गायक काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांचे दिव्यसूर चिरकाळ मागे गुंजतच कसे राहतात, याचा प्रत्यय गौरव बान्गियाच्या ‘फिर वही शाम’ मैफिलीने परत दिला नि रसिक मन आजच्या मराठी भाषेत कण्हत राहिलं- ‘वुई मिस् यू’ तलतदा, वुई विल् मिस् यू फॉर एव्हर’!

नीला उपाध्ये 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.