काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागणाऱ्यांचा सत्यानाश होतोच !

19 May 2023 20:18:42
uddhav thackeray

मुंबई
: ''केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यात दहा महिन्यांपूर्वी आलेल्या राज्य सरकारने गरीब कल्याणाच्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आणि अखेरच्या माणसाला लाभ मिळवून दिला आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने aआज महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले सरकार आले आहे. खरेतर २०१९ साली महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीला जनतेने निवडून दिले होते. पण खुर्चीच्या मोहापायी उद्धव ठाकरे पदाकडे आकृष्ट झाले आणि काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नादाला लागले. पण इतिहास आहे जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागला त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याची प्रचिती महाराष्ट्राला पुन्हा एकदा आली'' या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शुक्रवार, दि. १९ मे रोजी नागपूर दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ''उद्धवजींनी खुर्चीच्या मोहपायी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संग केला, हिंदुत्वाचा विचार सोडला. त्याचा परिणाम म्हणून जे विचाराने आमच्या सोबत होते त्यांनी उद्धव ठाकरेंची सोबत सोडून भाजपशी युती केली आणि राज्यात सरकार आणले. हिंदुत्ववादी लोकांनी एकत्र येऊन बनवलेले सरकार म्हणून आज शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात काम करत आहे,' असे फडणवीसांनी यावेळी म्हटले.

जलसंधारणात महाराष्ट्र अव्वल स्थानी

फडणवीस म्हणाले की, ''जर आपण मागील दहा महिन्यांमध्ये राज्य सरकारचा कारभार पाहिला तर आपल्या सहजगत्या लक्षात येईल की राज्य सरकार कशाप्रकारे गरीब कल्याणाच्या योजना राबवित आहे. विदर्भासह महाराष्ट्रात अनेक प्रकल्प येत असून नव्या प्रकल्पांमध्ये लोकांचा सहभाग वाढत आहे. जलयुक्त शिवारसह जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये लोकांचा रस वाढत आहे. भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये वर्ष २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र जलसंधारणात अव्वल क्रमांकावर होता,'' अशी आठवणही फडणवीसांनी यावेळी करून दिली. कोराडी येथे होत असलेल्या नव्या ऊर्जा प्रकल्पाला काहींचा विरोध होत आहे. मात्र प्रदूषणकारी जुन्या युनिटला हा नवीन प्लांट पर्याय ठरू शकतो त्यामुळे त्याला होणार विरोध थांबला पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कुणी आडकाठी केली तर सांगा, त्याला सरळ करतो !

''शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देण्याचे काम राज्य सरकार करत आहे, महिला भगिनींना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनेच घेतला. समाजातील मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आणण्याचे यशस्वी प्रयत्न देखील आपल्या राज्य सरकाराच्या काळात होत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम कराच पण त्यासोबतच राज्य सरकार आणि जनता यांच्यात सेतू म्हणून काम करणेही आवश्यक आहे,'' असे निर्देशही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिले. मी कधीच कुणाला घाबरत नाही, कॉम्प्रमाईज करत नाही. जे योग्य आहे ते मी करतोच आणि जे अयोग्य असेल तर मी जवळच्या व्यक्तीने सांगितले तरी मी करत नाही. जनतेचे काम करताना चांगली भूमिका घेत असताना जर तुम्हाला कुणी आडकाठी केली तर मला सांगा मी त्याला सरळ करतो, असा सज्जड दमही त्यांनी विकासाला विरोध करणाऱ्या मंडळींना दिला आहे.

विकासकामांचा धडाका आणि मॅराथॉन बैठका !

आपल्या एक दिवसीय दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामांचा आढावा घेतला. सावनेर येथे उपविभाग अंतर्गत आढावा बैठक आणि भाजप कार्यकर्त्यांचे संमेलन, काटोल येथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांचे उदघाटन, काटोल येथे उपविभाग अंतर्गत बैठक आणि अखेरीस काटोलमधील भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संमेलनाला उपस्थिती असा झंझावाती दौरा फडणवीसांनी एका दिवसात पूर्ण केला.
Powered By Sangraha 9.0