साहेबांचे ढासळते सत्ताकेंद्र!

18 May 2023 21:40:54
UK

ज्या प्रशस्त, आलिशान प्रासादातून देशाचा कारभार हाकला जातो, ते त्या देशाचे सत्ताकेंद्र. जशी आपली राजधानी दिल्लीतील संसदेची इमारत, तशीच साहेबांच्या देशातील म्हणजेच ब्रिटनमधील ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’ ही लंडनस्थित संसदेची देखणी इमारत. ब्रिटन अर्थात युनायटेड किंग्डमचा राज्य कारभार याच ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यताप्राप्त भव्य इमारतीतून चालविला जातो.

पण, अशा या सत्ताकेंद्रालाच सध्या तडे गेले असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे. एवढेच नाही, तर साधारण १५० वर्षं जुनी अशी ही ऐतिहासिक इमारत धोकादायक अवस्थेत असून, वेळीच त्याची योग्य ती डागडुजी केली नाही, तर अनर्थ घडेल, असा इशाराच तेथील संसदीय समितीने सुनक सरकारला नुकताच दिला. त्यामुळे पुन्हा एकदा ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’च्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रकल्प आणि त्याकडे लोकप्रतिनिधींनी आजवर केलेले दुर्लक्ष, हा विषय ब्रिटनमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

लंडनमधील मध्यवर्ती ‘वेस्टमिन्स्टर’ या भागातील थेम्स नदीच्या काठावर राजेशाही थाटात उभा असलेला ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर.’ आजही या इमारतीच्या नावात ‘पॅलेस’ हा शब्द कायम असला तरी इंग्लंडच्या राजघराण्याचे या इमारतीत वास्तव्य नाही. पण, मध्ययुगीन काळात इंग्लंडची राजेशाही याच राजमहालातून सातासमुद्रापार राज्य करीत होती. वारंवार या ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यानंतर १५व्या शतकात जवळच असलेल्या ‘पॅलेस ऑफ व्हाईटहॉल’मध्ये राजघराण्याने आपले बिर्‍हाड हलविले. त्यानंतर याच ‘पॅलेस’मधून ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ या दोन्ही सभागृहांचे कामकाजही चालायचे. मात्र, दि. १६ ऑक्टोबर, १८३४ रोजी लागलेल्या मोठ्या आगीने या महालाची अक्षरश: राखरांगोळी केली. मग चार्ल्स बॅरी या वास्तुविशारदाने १८७०च्या सुमारास टप्प्याटप्प्याने दिमाखदार असा ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’ नव्याने गॉथिक शैलीत उभा केला. त्यानंतरही या एकूणच आठ एकर क्षेत्रात विस्तारलेल्या इमारतीत अंतर्गत बदल मोठ्या प्रमाणावर केले गेले.

सध्या ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’मध्ये एक हजारांहून अधिक खोल्या असून ग्रंथालय, व्यायामशाळा, कॉन्फरन्स रुम्स असा अवाढव्य पसारा ही इमारत सांभाळून आहे. पण, संसदीय समितीने केलेल्या दाव्यानुसार, १९४० नंतर अद्याप या इमारतीतील मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम फारशी बदललेली नाही. तसेच, आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. एका आकडेवारीनुसार, २०१६ पासून ते आजतागायत ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’मध्ये तब्बल ४४ वेळा आगी लागण्याच्या घटनांची नोंद आहे. त्यामुळे आगीपासून, पावसापासून या इमारतीचे संरक्षण करण्यासाठी त्याची डागडुजी ही अत्यावश्यक. तसा प्रस्तावही संसदीय समितीतर्फे पाच वर्षांपूर्वी सरकारला देण्यात आला. पण, तो थंड बस्त्यात फेकला गेला. संसदीय समितीने तर थेट आरोप केला आहे की, लोकप्रतिनिधींना फक्त त्यांचे कामकाज, त्यांचे कार्यालय याचीच काळजी असून, या इमारतीत काम करणारा कर्मचारीवर्ग, भेट देणार्‍या इंग्लंडवासीयांच्या जीविताचे मोल ते शून्यच! परिणामी, आज या इमारतीच्या वरवरच्या डागडुजी आणि दुरूस्तीचा केवळ आठवड्याचा खर्च हा २० कोटी रुपये इतका प्रचंड आहे. त्यामुळे इंग्लंडच्या लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक, राजकीय वारसा लाभलेल्या इमारतीकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळेच आज करदात्यांचा पैसा असा पाण्यासारखा दुरूस्तीवर वाहण्याची नामुष्की तेथील सरकारवर ओढावलेली दिसते.

एकीकडे ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’ची अशी ही दुरवस्था, तर दुसरीकडे नुकतेच राजा चार्ल्स तृतीयच्या राज्याभिषेक सोहळ्यावर मात्र तब्बल १०० दशलक्ष पाऊंडांची उधळपट्टी करण्यात आली. यावरून इंग्लंडमधील लोकशाही ही अजूनही राजेशाहीच्या प्रभावातून बाहेर पडलेली नाही, हेच अधोरेखित होते. एकीकडे आर्थिक गटांगळ्या खाणार्‍या इंग्लंडला त्यांच्याच संसदेच्या आधुनिकीकरणाचा वर्षानुवर्षे मुहूर्त मिळत नसताना, भारतात मात्र अल्पावधीत सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असे नवीन संसद भवन लोकार्पणासाठी सज्ज आहे. त्यामुळे भारतावर दीडशे वर्षं राज्य करणार्‍या साहेबांच्या देशाची एकीकडे ही बिकट अवस्था, तर दुसरीकडे भारतात नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला भव्य सोहळा... असा हा सुखावह विरोधाभास!
Powered By Sangraha 9.0