स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी नव्या संसदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घान

    18-May-2023
Total Views |
narendra modi

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८मे रोजी संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तसे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. विशेष म्हणजे २८ मे रोजी पंतप्रधानांच्या कार्यकाळास ९ वर्षे पूर्ण होत असून त्याच दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीदेखील आहे.

आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असलेल्या संसद भवनाच्या नव्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी राष्ट्रार्पण होणार आहे. त्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी बिर्ला यांनी पंतप्रधानांना संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रित केले. नवीन संसद भवनाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे आणि नवीन इमारत आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक आहे, असे लोकसभा सचिवालयातर्फे सांगण्यात आले आहे.

नवीन संसदेचे क्षेत्रफळ ६४ हजार ५०० चौरस मीटर आहे. नव्या संसद भवनामध्ये लोकसभेमध्ये ८८८ तर राज्यसभेमध्ये ३२६ हून अधिक सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या सभागृहामध्ये एका वेळी एकुण १ हजार २२४ सदस्यांची बसण्याची व्यवस्था आहे. नव्या वास्तूचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केले असून त्यासाठी ९७१ कोटी रूपये खर्च येणार आला आहे. नव्या संसदेसह सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या कंपनीतर्फे तयार करण्यात आला आहे. संसदेची नवी वास्तू जुन्या वास्तूपेक्षा जवळपास १७ हजार वर्गमीटरने जास्त आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.