नक्षलवादविरोधी चळवळीचा आदर्श ‘उदय’

18 May 2023 20:56:24
uday jagtap

पुण्यातील आदर्श तरुण मंडळाने गरजूंना मदत करण्यापासून ते गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात वीज पोहोचविण्यापर्यंत मजल मारली. या मंडळाची संकल्पना मांडत, त्याची धुरा वाहणार्‍या उदय जगताप यांच्याविषयी...

उदय जगताप यांचा जन्म पुण्यातल्या शुक्रवार पेठेतला. त्यांचा मंडईमध्ये लिंबू विक्रीचा कौटुंबिक व्यवसाय होता. शाळेत असताना कराटे शिकायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला. दरम्यान, कराटेमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त करीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळविली. दरम्यान, त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ‘सिटी बँके’त नोकरी मिळाली. यातील ‘सिटी बँके’ची नोकरी त्यांनी पत्करली. परंतु, कालांतराने बँकेचे काम कमी झाले. बँकेने काही कामे ‘आऊटसोर्सिंग’ करण्यास सुरुवात केली. जगताप यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करीत बँकेची कामे घेण्यास सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. शेकडो मुलांना त्यामुळे रोजगार मिळू लागला.

जगताप हे लहानपणापासूनच गणेश मंडळाचे कार्यकर्ते. सामाजिक कामात त्यांना रस होताच. पुणे शहरात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांचा सहभाग वाढविण्याकरिता हा उत्सव सुरू करण्यात आला. मागील काही वर्षांत मात्र या उत्सवाला हिडीस स्वरुप प्राप्त झालेले आहे. समाजही अलीकडे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पाहून नाके मुरडू लागला आहे, ते त्यांच्या लक्षात आले. गणेश मंडळाच्या कामाला विधायक स्वरुप कसे द्यायचे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच काही मित्रांना सोबत घेऊन त्यांनी ‘आदर्श मित्रमंडळ’ नावाने मंडळ स्थापन केले. वाईट मार्गाला लागलेली युवा शक्ती, तरुणांना चांगला मार्ग दाखवून ते भरकटण्याआधीच सावरण्याची मोहीम सुरू झाली. ३० मित्रांसह सुरू झालेल्या मंडळाने कोणाकडेही वर्गणी मागायची नाही, असे ठरवले. या मित्रांनी काही व्यवसाय सुरू केले. एका महिन्यांचे उत्पन्न मंडळाला द्यायचे, असा नियम सर्वांनी घालून घेतला.

पुण्यात वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांसोबत मिळून ‘गुन्हेगार दत्तक योजना’ राबविण्यात आली. या मुलांचे समुपदेशन करण्याचे काम सुरू झाले. त्यामधूनच २०१० साली पुण्यातील ‘दत्तवाडी पॅटर्न’ उदयास आला. यासोबतच कारागृहातील कैद्यांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले. ‘भोई प्रतिष्ठान’ आणि आदर्श मंडळाच्या माध्यमातून कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने अनेक कैद्यांना शिक्षा भोगून झाल्यावर समाजात स्विकारार्हता वाढावी, याकरिता प्रयत्न करण्यात आले. अनेकांना नोकर्‍या लावण्यात आल्या.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांच्या हल्ल्यात पोलीस मृत्युमुखी पडत असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. या भागात काम करायला हवे, असे मंडळाने ठरवले. कोणत्याही ‘एनजीओ’ पोलिसांसोबत काम करायला तयार होत नसल्याच्या काळात मंडळाने कामाला सुरुवात केली. मागील सात वर्षांत अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त ७२ गावांमध्ये मंडळाच्या माध्यमातून वीज पोहोचविण्यात आली. त्यासाठी सौरऊर्जेचा उपयोग करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावांमध्ये वीज पोहोचली. नक्षल्यांच्या हल्ल्यात घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या तसेच नक्षलींनी वाळीत टाकलेल्या घरातील मुलांना सायकली देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. ही मुले पाच-पाच किलोमीटरची अनवाणी पायपीट करून शाळेत जायची. या भागात आरोग्याच्या समस्या आजही कायम आहेत. अशा गावांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींच्या मुलांकरिता बालवाडी आणि शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले. काही कुटुंबांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. एका गावात राईस मिलदेखील सुरू करून देण्यात आली, तर दुसर्‍या एका गावात संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. ३२ पोलीस ठाण्यांना १३ हजार, ५०० पुस्तके देऊन ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. गडचिरोली पोलीस आणि ‘आदर्श मित्रमंडळा’च्या या कामासाठी शांततेचे उत्कृष्ट प्रयत्न केल्यामुळे त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये घेण्यात आली. ‘महाराष्ट्र दर्शन’ या उपक्रमांतर्गत नक्षलग्रस्त भागातील ८० मुलांना पुण्यात आणले जाते. त्यांना पुण्याच्या लोकांची-संस्कृतीची ओळख करून दिली जाते. आजवर २२ सहली पुण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परस्पर विश्वास वाढीस लागला.

‘सीआरपीएफ’च्या मदतीने २५ पेक्षा अधिक लोकांना पोल्ट्री काढून देण्यात आल्या आहेत. या सर्व कामांसाठी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या रोजगार मंडळामार्फत निधी गोळा केला जातो. स्वत:च्या खिशामधून हे सर्व खर्च केले जातात. काही जवळचे मित्र त्यांना स्वत:हून मदत करतात. परंतु, कोणाकडेही वर्गणी अथवा देणगी मागितली जात नाही. पुण्यातही अलीकडेच ‘स्पोर्ट्स लायब्ररी’ आणि ‘भगिनी हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. मंडळाच्या कामामुळे अनेक गुन्हेगार आणि कैदी परावृत्त झाले असून चांगले आयुष्य जगत आहेत. आदर्श मंडळाने खरोखरीच आदर्श काम उभे केले आहे. समाजातील माणूसपणाचे काम करणार्‍या मंडळासह अध्यक्ष उदय जगताप यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

लक्ष्मण मोरे 
Powered By Sangraha 9.0