साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना दिलासा, मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक

18 May 2023 15:32:52
sai baba

मुंबई
: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते.

संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


Powered By Sangraha 9.0