तोकडे कपडे घालून मंदिर प्रवेश नाहीच! रांजणगाव मंदिराचाही निर्णय

18 May 2023 18:22:15
 
Ranjangaon Temple
 
 
मुंबई : तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे. या नंतर लगेचच पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने देखील असाच निर्णय घेतला आहे.
 
अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात तोकडे कपडे घातलेले तसेच अंगप्रदर्शन करणारे, असभ्य अशोभनीय वस्त्रधारी, उत्तेजक कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेले, बर्मुडाधारक यांना आता मंदिरात प्रवेश नाही. वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घातलेल्यांनाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान राखणाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
 
श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी काही पुजारी तुळजाभवानी मंदिर परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तुळजापूर मंदिर प्रशासनाने एक नोटीस काढली आहे. ही नोटीस मंदिर परिसरातील भितींवरती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी ड्रेस कोड शिवाय मंदिरात प्रवेश करू नये अन्यथा देऊळ कवायत कायदा (निजाम कालीन कायदा) नुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0