देशातील पहिल्या उन्नत द्रुतगती महामार्गाची उभारणी अंतिम टप्प्यात

18 May 2023 17:48:21
Nitin Gadkari

नवी दिल्ली : देशातील पहिला उन्नत द्रुतगती महामार्ग – द्वारका एक्सप्रेस वेची उभारणी अंतीम टप्प्यात असून एप्रिल २०२४ साली त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका एक्सप्रेस वेच्या उभारणीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, या द्रुतगती मार्गाचे रस्त्यांचे जाळे चार स्तरांचे आहे. उड्डाणपुलावर बोगदा, अंडरपास, ग्रेड रोड, एलिव्हेटेड रोड, उड्डाणपूल बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला तीन पदरी सेवा रस्ता तयार करण्यात येत आहे. मंत्री म्हणाले की, दिल्लीतील या एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात रुंद 3.6 किलोमीटर लांबीचा 8-लेन बोगदा तयार केला जात आहे. यामुळे हरियाणा आणि पश्चिम दिल्लीतील लोकांचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क सुधारेल. या महामार्गाच्या उभारणीसाठी ९ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. या महामार्गाची बांधणी सध्या अंतिम टप्प्यात असून एप्रिल २०२४ मध्ये या महामार्गाचे लोकार्पण केले जाणार असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी नमूद केले आहे.


Powered By Sangraha 9.0