वंदे भारत म्हणजे भारताच्या गती आणि प्रगतीचे स्वरूप – पंतप्रधान नरेंद्र मोदी

18 May 2023 18:02:12
Narendra Modi on Vande Bharat

नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेस हे भारताची गती आणि प्रगतीचे स्वरूप आहे. वंदे भारत रेल्वेमुळे देशातील दळणवळण आणि विकासाचा नवा अर्थ प्रस्थापित झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

वंदे भारत एक्सप्रेस ही आधुनिक आणि महत्वाकांक्षी भारताचे प्रतीक आहे. जेव्हा वंदे भारत गाडी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी धावते तेव्हा भारताची गती आणि प्रगती दिसून येते. गती आता ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पहायला मिळेल. यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या उत्तम अनुभवाबरोबरच विकासाचा अर्थ पूर्णपणे बदलेल. देव दर्शनासाठी कोलकाता ते पुरी प्रवास असो किंवा इतर मार्गाने प्रवास असो, प्रवासाचा वेळ आता केवळ साडेसहा तासांवर येईल. त्यामुळे वेळेची बचत होईल, व्यवसायाच्या संधी वाढतील आणि तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील. लांबचा प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणाही नागरिकासाठी रेल्वेला पहिली पसंती आणि प्राधान्य असते असे पंतप्रधान म्हणाले.

Narendra Modi on Vande Bharat

 
स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या युगाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी देशाची एकता आणि अखंडता अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की जर देश संपूर्णपणे एकसंध राहिला तर देशाच्या एकत्रित क्षमता देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवतील. वंदे भारत हे अशाच विश्वासाचे प्रतिबिंब आहे कारण यामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेत या गाड्या देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून कार्य करत आहेत. भारतीय रेल्वे प्रत्येक देशवासियाला जोडते आणि एकमेकांशी बांधून ठेवते आणि याच कल्पनेसह आणि विचारासह वंदे भारत एक्सप्रेस देखील मार्गक्रमण करणार आहे. देशाच्या विविध राज्यांमधून याआधीच पंधरा वंदे भारत गाड्या चालविल्या जात असून त्यांच्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधानांनी पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी, ओदिशातील रेल्वेच्या जाळ्याचे 100% विद्युतीकरण, संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अंगुल - सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर - रुरकेला - झारसुगुडा - जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन आणि बिच्छुपली - झरतरभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.



Powered By Sangraha 9.0