शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपर्कसेतू उभारा : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा

18 May 2023 19:57:15
j p nadda

पुणे
: आगामी लोकसभा-विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संबोधित करताना कार्यकर्त्यांना भाजपासाठी खपलेल्या चार पिढ्यांच्या त्यागाची आठवण करुन दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, संवेदनशीलता आणि संवाद या सात सूत्रांवर कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात गावोगावी तसेच प्रत्येक घरात जाऊन सरकारच्या कामांचे यश आणि विरोधी पक्षांचे अपयश पोचविण्याचा कार्यक्रम देखील दिला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवीजी, विनोद तावडे, तरुण चूक, शिवप्रकाश जी, पंकजाताई मुंढे, केंद्रिय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भारतीताई पवार, आशिष शेलार, सुधीरजी मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, गिरीषजी महाजन यांच्यासह आमदार खासदार उपस्थित होते. नड्डा यांनी बोलताना, लोकांच्या भाजपाकडून मोठ्या आशा आहेत. भाजपाचा कार्यकर्ता हा सकारात्मक बदलाचे साधन असल्याचे म्हटले. आत्मचिंतन करताना लोकांच्या आशा-आकांक्षांना पुरे पडण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षाच्या कमजोरीवर नव्हे तर आपल्या मजबुतीवर आपल्याला विजय हवा आहे. त्याकरिता योजना आखाव्यात. संघटनात्मक काम अधिक मजबूत व्हायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचे आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु आहेत. रस्ते, मेट्रोचे जाळे दिवसागणिक विस्तारत चालले असून जगतभरात भारताचे स्थान उंचावलेले आहे. आपण जगातली मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येत आहोत. अनेक देशात मंदी असतानाही आपण खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी केलेली विकासकामे, योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. काँग्रेसला विकास दिसत नाही. त्यांना आपण डोळे दिले तरीदेखील दृष्टी कशी देणार असा प्रश्न त्यांनी केला. राहूल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचे ते म्हणाले. १०लाख ४०हजार बूथ आहेत. त्यापैकी ८ लाख ४० हजारांपर्यंत आपण पोचलो आहोत. उर्वरीत बुथपर्यंत पोचण्यासाठी योजना आखण्यात यावी असे ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0