ज्ञानवापी प्रकरण; शिवलिंगाच्या कार्बन डेटींगला मुस्लिमांचा विरोध

18 May 2023 18:40:02
gyanvapi

नवी दिल्ली
: ज्ञानवापी संकुलामधील मशीद परिसराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेली वस्तू शिवलिंग आहे की कारंजी आहे का, याची शास्त्रोक्त तपासणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुस्लिम पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा उल्लेख सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी केला होता.

मुस्लिम पक्षाने याचिकेत म्हटले की, अंजुमन इंतेजामिया मशिदीच्या व्यवस्थापन समितीने देखभालक्षमतेच्या मुद्द्यावर वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर अद्यापही निर्णय प्रलंबित आहे. असे असताना न्यायालयाने कार्बन डेटींग करण्याच्या मागणीस परवानगी बहाल केली आहे. त्यामुळे यावर तत्काळ सुनीवणी घ्यावी, अशी विनंती मुस्लिम पक्षातर्फे करण्यात आली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, १२ मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने कार्बन डेटींग करण्याती परवानगी दिली आहे. शिवलिंगास इजा न पोहोचविता कार्बन डेटींगसह अन्य शास्त्रीय पद्धतींचा वापर करणे शक्य असल्याचा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने न्यायालयास सादर केला होता. त्यानंतर न्यायालयाने कार्बन डेटींग करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचेच पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल केली असून त्यावर २२ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Powered By Sangraha 9.0