मुंबई : जोगेश्वरी पुर्व येथील पूनमनगर येथील पी.एम.जी.पीच्या इमारतीची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याची मागणी आमदार रवींद्र वायकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. पूनमनगर येथील १७ इमारती अति धोकादायक आहेत. यात सुमारे ९८२ सदनिकाधारक रहात आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारतींची डागडुजी करावी, अशी मागणी वायकरांनी म्हाडाकडे केली आहे. तसेच राज्य सरकारलाही यावेळी वायकरांनी याप्रश्नी विचारणा केली आहे. राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, पावसाळ्यात घडणाऱ्या इमारत दुर्घटना लक्षात घेता, येत्या पावसाळ्यात कुठलीही अप्रिय घटना घडण्यापुर्वी या अतिधोकादायक इमारतींची डागडुजी म्हाडाने तात्काळ करावी, अशी सुचना आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाकडे केली आहे. तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतर करण्यासाठी म्हाडाने ट्रान्झीट कॅम्प द्यावेत, अशीही मागणी रवींद्र वायकरांनी म्हाडाकडे केली. सदर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी टेंडर काढावे किंवा म्हाडानेच इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी मागणीही वायकर यांनी केली.