प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ

16 May 2023 17:57:52


chiratarun chitrapat 
 
मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, दगडी चाळ २, बळी, कारखानिसांची वारी अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे ५५ वर्षांपूर्वीचा चिरतरुण चित्रपट 'आम्ही जातो अमुच्या गांवा'. या चित्रपटातील देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, मला हे दत्तगुरु दिसले, हवास मज तू आणि स्वप्नात रंगले मी… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पहाण्याची संधी मिळणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच १८ मेला दुपारी १ वाजता हा सिनेमा प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
 
१९६७ साली रिलीज झालेल्या या सिनेमाला उदंड यश मिळालं. तीन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरात शिरतात. मात्र घरातील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या वागणूकीने त्यांच्यातील माणूसकी जागी होते आणि ते सन्मार्गाला लागतात अशी सिनेमाची कथा. अनेक दिग्गज कलाकार, जगदीश खेबुडकर आणि वंदना विटणकर यांची गाणी आणि सुधीर फडके यांच्या संगीताने या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. असा हा आठवणीतला ठेवा पुन्हा अनुभवायचा असेल तर नक्की पहा ५५ वर्षांचा चिरतरुण चित्रपट ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ १८ मेला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चर.
Powered By Sangraha 9.0