मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या परिवर्तनामुळे आता काँग्रेसच्या हाती राज्याची सत्ता आली आहे. बहुमत असूनही काँग्रेसला अद्याप आपला मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही ही त्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. मात्र, मंत्रिपदासाठी काही नावे कन्फर्म असून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित मानले जात आहे. या नावांमध्ये काँग्रेसचे वादग्रस्त नेते आमदार सतिश जारकीहोळी यांचाही समावेश असून ते मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या टिप्पणीमुळे जारकीहोळी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. मात्र त्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यामुळे छत्रपतींविषयी काँग्रेसच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संभाजी महाराजांविषयी केले होते वादग्रस्त विधान !
काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. ''संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्नात विष मिसळले होते आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी संभाजी महाराजांची हत्या केली,'' असा दावा जारकीहोळी यांनी केला होता. त्यांच्या या विधानावरून महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्तांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
कोण आहेत सतीश जारकीहोळी ?
सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे वजनदार नेते असून अनेक वर्षांपासून आमदार आहेत. डीके शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अग्रक्रमाने चर्चिले गेले होते. मात्र, सध्यातरी ते या शर्यतीतून बाहेर पडल्याचे दिसत आहे. यमकनमर्डी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे इतर तीन भाऊ आमदार असून जारकीहोळी कुटुंबाचा एकूण दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे.