आग्रा : मथुरेच्या केशवदेव मंदिरातील मूर्ती आग्राच्या शाही जामा मशिदीच्या पायर्यात गाडल्या गेल्या असल्याचा दावा ‘श्री कृष्णजन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्ट’चे संरक्षक कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारल्याने येत्या काळात येथील परिस्थिती स्पष्ट होऊन सत्य उलगडेल, असे म्हटले जात आहे. देवकीनंदन महाराज यांनी दावा केल्यामुळे आग्रा येथील जामा मशिदीच्या पायर्यांचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून या पायर्या खोदण्यासाठी कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने उत्तर देण्याकरिता जामा मशीद इंतजामिया कमेटी, छोटी मशीद, दीवान ए खास, जहांआरा मशीद, आग्रा किल्ला, यूपी सेंट्रल वक्फ बोर्ड लखनौ आणि श्रीकृष्ण सेवा संस्थान यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणातील सर्व पक्षांना बुधवार, दि. ३१ मेपर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. आग्रा येथील जामा मशिदीच्या पायर्यांमध्ये भगवान कृष्णाच्या मूर्ती गाडण्यात आल्याचा दावा देवकीनंदन महाराज यांनी केला असून, पायर्या खोदून मूर्ती बाहेर काढाव्यात, अशी मागणी केली आहे.
देवकीनंदन महाराज म्हणतात...
११ मे रोजी ट्रस्टच्यावतीने न्यायालय सिव्हिल जज (प्रवर खंड), आग्रा यांच्यासमोर केस क्रमांक ५१८/२३ दाखल केली होती. यामध्ये आग्रा येथील मशिदीच्या (जहानारा बेगम मशीद) पायर्यांमध्ये दफन केलेल्या भगवान केशवदेवांच्या देवतांना परत मिळवून देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. मागच्या माहिन्यात भागवत कथेदरम्यान आग्रा येथे बंधुत्वाचे आवाहन करत मूर्ती परत करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव न्यायालयाची मदत घ्यावी लागली. मुघल शासक औरंगजेबने १६७० मध्ये मथुरा येथील केशवदेव मंदिर तोडले. त्याने केशवदेव यांची मूर्ती आग्रा येथील जामा मशिदीच्या पायर्याखाली पुरली. औरंगजेब याच्याशी समकालीन इतिहासकारांनी याचे वर्णन त्यांच्या पुस्तकात केले आहे. त्यामुळे मुर्त्या बाहेर काढल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांची पूजा केली जाऊ शकेल.