अतिक्रमण निर्मूलन पथकावर प्राणघातक हल्ला

16 May 2023 17:49:44
pune

पुणे
: जी २० निमित्त आरटीओ परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर काही व्यावसायिक आणि पथारी धारकांनी हल्ला करीत मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. या सर्व घटनेचा पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे.

महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई करीत होते. नायडू हॉस्पिटल जवळील कैलास स्मशानभूमी रस्त्यावर ही कारवाई सुरू होती. आरटीओ कार्यालय परिसरात जी २० च्या निमित्त ही कारवाई सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळी काही समाजकंटकांनी आणि व्यावसायिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला.

यावेळी पोलिसांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. या घटनेचा महापालिकेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजता अतिक्रमण निरीक्षक, सेवक, अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांनी निषेध सभा आयोजित केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


Powered By Sangraha 9.0