मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे विधानसभेच्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माध्यमांना दिली. विदेश दौऱ्यावरून परत आल्यावर ते मुंबई विमानतळावर असताना पत्रकारांशी बोलत होते. तसेच निर्णय काय घेणार हे आताच सांगू शकत नाही, असेही राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच निर्णय घेतला जाईल, तसेच गोगावलेंची निवड कायमस्वरुपी बेकायदेशीर ठरवलेली नाही असा निर्वाळा त्यांनी दिला. ' राजकीय पक्ष कोणता खरा', हे पाहूनच प्रतोद ठरविण्यात येईल, तसेच लवकरात लवकर निर्णय कसा देता येईल याकडेच प्रयत्न असतील, असेही नार्वेकरांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा तिढा नेमका कधी सुटणार याकडेच महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. यानिर्णयावर ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे मविआतील नेत्यांचे या निर्णयाकडे विशेष लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.