मुंबई : राज्यातील आणि देशातील युवकांची वाढती संख्या लक्षात घेता भाजपकडून युवकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. युवक मतदारांना साद घालण्यासाठी भाजपकडून मुंबईत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांशी सुसंवाद आणि संपर्क करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर भाजपकडून काही विशेष अभियान देखील राबवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनतेला भाजपशी जोडण्यासाठी भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे ते १५ जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान असणार असून, महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवले जाणार आहे.
नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न
येत्या निवडणुकीत भाजप नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. बदललेली राजकीय समीकरणे, ठाकरेंसमोर निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न आणि भाजपासाठी निर्माण झालेले पोषक वातावरण या वातावरणात काहीही झालं तरी महापालिका जिंकायचीच या उद्दिष्टाने मैदानात उतरलेले भाजपने अभियानाची मालिका सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उभा अभियानाकडे पाहिले जात आहे.